राज्यात काही दिवसांपासून ग्रामीण भागातील मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत आहेत. हे शेततळे अनेक बालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. लहान मुलंच नव्हे तर सराईत पोहणारी मोठी माणसंही शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडत आहेत.
या समस्येवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृती करावी अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री धनंजय मुंडे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शेततळ्यांचे काठ निसरडे असतात, तसेच अनेकदा शेततळ्यात गाळ साचलेला असतो. त्यामुळे शेततळ्यात लहान मुलेच काय, अगदी पट्टीचे पोहणारे व्यक्तीही बुडण्याची शक्यता असते. यासाठी शेततळ्याची रचना, त्यापासून असणारे धोके विद्यार्थ्यांना सांगावे.
शेततळ्यात पोहण्यासाठी जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती बुडताना आढळल्यास काय करावे याची माहिती विद्यार्थ्यांना असली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी आ. तांबेंनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केलेली आहे.
शेततळ्यास कुंपण घालावे, लहान मुलांना प्रवेश करता येणार नाही अशी व्यवस्था करावी. शेततळ्याच्या चारही बाजूला धोक्याची सूचना देणारी पाटी लावावी. जेणेकरून मनुष्य अथवा जनावर शेततळ्यात उतरू नये. अशी मागणी आ. तांबेंनी कृषीमंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे केली.
तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे शेततळ्यास कुंपण घालणे, टायर ट्यूब, ड्रम अशा वस्तू पाण्यात सोडणे, पायऱ्या तयार करणे, दोरखंड सोडणे अशा वस्तूंच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांनी या बाबी समजून घेणे आवश्यक आहेत.
शेततळ्याची रचना, त्यापासून असणारे धोके लक्षात घेणे. शेततळ्यात पोहण्यासाठी जाऊ नये यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. एखादी व्यक्ती बुडताना आढळल्यास काय करावे याची माहिती नागरिकांना देणे. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून शेततळ्यापासून असलेल्या धोक्याबाबत समाजात गांभीर्य निर्माण करणे हे देखील आवश्यक आहे. या उपाययोजनांमुळे होणाऱ्या दुर्घटना टळू शकतात. – सत्यजीत तांबे, आमदार