Sujay Vikhe News : 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला आणि भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने केंद्रात सत्ता देखील स्थापित केली आहे. 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. यामध्ये काही केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश होता हे विशेष.
यावेळी भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा आपल्या मित्रांच्या सहकार्याने केंद्रात सत्ता स्थापित केली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत बीजेपीला मोठा फटका बसला आहे. भारतीय जनता पक्षाला यावेळी स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. गेल्या दोन निवडणुकीत म्हणजेच 2014 आणि 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला होता.
यंदा मात्र बीजेपीला अवघ्या 240 जागांवर विजय मिळवता आला आहे. बीजेपीच्या अनेक ताकतवर नेत्यांचा पराभव झाला असल्याने भारतीय जनता पक्षात पराभवावर मंथन सुरू झाले आहे. अशातच अहमदनगर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले बीजेपीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएमवर संशय उपस्थित केला आहे. त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करावी अशी मागणी माननीय निवडणूक आयोगाकडे केलीय.
यासाठी त्यांनी आयोगाकडे अर्ज सादर केला असून चौकशी करण्यासाठी लाखो रुपये शुल्क देखील भरले आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम मशीन करिता चाळीस हजार रुपये आणि त्यावर १८ % जीएसटी प्रमाणे शुल्क भरला गेला आहे. विखे पाटील यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशीन चौकशी करण्याची मागणी केली असून मतदार संघातील चाळीस मतदान केंद्रासाठी त्यांनी 21 लाख रुपये शुल्क भरले आहे.
एकंदरीत सुजय विखे पाटील यांना निवडणुकीचा पराभव चांगला जिव्हारी लागला आहे. यामुळे त्यांनी ही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, यानिमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात चर्चेत आला आहे एवढे नक्की. वास्तविक, पारनेरचे माजी आमदार हे एकसंध राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित दादा यांच्या समवेत होते म्हणजेच ते महायुतीचा भाग होते.
मात्र निवडणुक लढवण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी अजितदादा यांच्या गटाला सोडचिठ्ठी दिली आणि पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे परतलेत. शरद पवार गटात सामील झाल्यानंतर निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून नगर दक्षिण लोकसभेचे तिकीट मिळाले. सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात निवडणूकीची लढत झाली. या निवडणुकीत राजकारणातील चाणक्य म्हणून ख्यातनाम असणारे शरद पवार यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली.
जोपर्यंत निवडणूक सुरू होती, निकाल लागलेला नव्हता तोपर्यंत सुजय विखे पाटील हेच विजयी होणार असे वाटत होते. अनेक एक्झिट पोल मध्ये देखील सुजय विखे पाटील यांचे पारडे जड असल्याचे म्हटले जात होते. मात्र, सुजय विखे पाटील यांचा लंके यांनी 28 हजार 929 मतांनी पराभव केला.
निलेश लंकेंना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली आणि सुजय विखे पाटील यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळालीत. अर्थातच ही निवडणूक खूपच काटेदार झाली अन या काटेदार लढतीत लंके यांनी विखे यांचा पराभव केला. पण आता निवडणूक निकालावर आक्षेप घेत पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता या प्रकरणाकडे अहमदनगर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे.