पैसे कमावणे आणि त्या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे या सगळ्या नियोजनाला तुमचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. परंतु आजकालच्या महागाईच्या कालावधीमध्ये पंधरा ते वीस हजार रुपये पगार असेल तर खर्च इतका मोठ्या प्रमाणावर होतो की बचत करणे लांबच राहते.
बचत केली नाही तर गुंतवणूक व्यक्ती करू शकत नाही व भविष्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर धावपळ होते व अनेक प्रकारच्या समस्यांना देखील आपल्याला तोंड द्यायला लागते. परंतु जर आर्थिक नियोजन किंवा आर्थिक शिस्त व्यवस्थित ठेवून योग्य पद्धतीने पैसा खर्च केला तर अगदी वीस हजार रुपये पगारांमध्ये देखील व्यक्ती चांगली बचत करून गुंतवणूक करू शकतो व हळूहळू छोट्या छोट्या गुंतवणुकीतून काही वर्षांनी करोडपती देखील होऊ शकतो.परंतु आर्थिक शिस्त गरजेचे आहेच.
परंतु ठरवलेला गुंतवणुकीचा प्लॅन प्रत्येक महिन्याला व्यवस्थित पाळणे देखील तितकेच गरजेचे असते. त्यामुळे या लेखात आपण असा एक फार्मूला बघणार आहोत की तुम्ही अगदी 20 हजाराच्या पगारामध्ये देखील चांगली गुंतवणूक करून काही कालावधीनंतर करोडपती होऊ शकतात.
70:15:15 चा फार्मूला अभ्यासा आणि त्यानुसार नियोजन करा
हा फार्मूला खूप महत्त्वाचा असून साधारणपणे वीस हजार रुपये पगार असेल तर फार्मूलानुसार तुम्हाला करोडपती होता येऊ शकते. जर सोप्या भाषेमध्ये आणि सुटसुटीतपणे हा फार्मूला समजून घ्यायचा असेल तर आपण उदाहरणाने समजू. या फार्मूल्यातील आकड्यानुसार पाहिले तर तुमच्या पगारांमधील 70% रक्कम तुम्ही तुमच्या ज्या काही आवश्यक गरज आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वापरावी. तसेच 15% रक्कम आपत्कालीन निधी म्हणजेच एखाद्या वेळेस भविष्यात काही इमर्जन्सी पैसे लागले तर त्याकरिता वेगळी काढावी व उरलेली पंधरा टक्के रक्कम गुंतवावी.
म्हणजे वीस हजार रुपये पगार असेल तर 70 टक्के म्हणजे 14 हजार रुपये तुम्ही तुमच्या घरच्या खर्चासाठी वापरू शकतात. म्हणजे काही झाले तरी तुम्हाला या 14000 मध्येच महिन्याचा संपूर्ण घरचा खर्च अड्जस्ट करायचा आहे. आणि आपत्कालीन निधी व गुंतवणुकीसाठी उरलेले सहा हजारामधून प्रत्येकी तीन हजार रुपये वेगळे ठेवायचे आहेत.
उरलेल्या तीन हजार मध्ये गुंतवणूक करून कसे होता येईल करोडपती?
गुंतवणुकीसाठी तुमच्या 20000 मधून प्रत्येक महिन्याला जे काही तीन हजार रुपये उरतील त्याची गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये करणे गरजेचे राहील. त्यामध्ये सरासरी 12 टक्क्यांचा परतावा मिळतो असे आपण पकडून चालू व त्यावर चक्रवाढीचा देखील फायदा मिळत असतो.
त्यामुळे एसआयपीमध्ये जर पैसे गुंतवले तर पैसे अगदी वेगाने संपत्तीत रूपांतरित होत असतात. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये तीस वर्षांसाठी गुंतवले तर तुम्ही एकूण दहा लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीवर तुम्हाला बारा टक्के दराने केवळ व्याजातून 95 लाख 9 हजार 741 रुपये मिळतात. अशाप्रकारे तुम्ही तीस वर्षांमध्ये एक कोटी पाच लाख 89 हजार 741 रुपयांचे धनी होऊ शकतात.
त्याकरिता तुमच्यात दीर्घकालीन गुंतवणुकीची क्षमता आणि तेवढा संयम असणे देखील गरजेचे आहे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे.