चर्चा तर होणारच ! परळीच्या बेरोजगार नवयुवकाने चंदन शेतीत हात आजमावला ; आता 5 कोटींच्या उत्पन्नाची आहे आशा

Farmer Success Story : महाराष्ट्रसह संपूर्ण देशात बेरोजगारी हा प्रश्न दिवसेंदिवस अकराळ विक्राळ असं स्वरूप घेत आहे. बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे, मात्र या बेरोजगारी मधूनही काही तरुण मार्ग काढत करोडो रुपयांची कमाई करू पाहत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याच्या एका प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने देखील असंच काहीसं केल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील उच्चशिक्षित बेरोजगार तरुणाने चंदन शेतीच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात आर्थिक स्थैर्यता आणली आहे. कनेरवाडी येथील ज्ञानेश्वर फड असे या नवयुवकाचे नाव असून त्यांनी बीएससी आणि आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर मात्र ज्ञानेश्वर यांनी नोकरी ऐवजी शेती व्यवसायातच नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.

या अनुषंगाने त्यांनी आपल्या सात एकर शेत जमिनीपैकी एक एकर शेत जमिनीत चंदन शेती सुरु केली आहे. अद्याप त्यांना चंदन शेती मधून उत्पन्न मिळालेले नाही. परंतु पुढील काही वर्षात त्यांना चंदनाच्या झाडांपासून उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान या चंदनाच्या शेतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या आंतर पिकाचे देखील प्रयोग केले आहेत. चंदन शेती मधून त्यांना शाश्वत उत्पन्न तर मिळणारच आहे शिवाय आंतरपिकांमधूनही त्यांना चांगला आर्थिक लाभ होत असल्याचे ज्ञानेश्वर यांनी सांगितले.

Advertisement

ज्ञानेश्वर यांनी सांगितल्याप्रमाणे चंदन लागवड करून त्यांना दोन वर्षे झाली आहेत. अशा परिस्थितीत चंदनाच्या झाडापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी त्यांना अजून आठ वर्ष वाट पहावी लागणार आहे. मात्र आठ वर्षात यातून पाच कोटींपर्यंतच शाश्वत उत्पन्न मिळेल असं त्यांचं मत आहे. शिवाय चंदनाच्या झाडात आंतरपीक म्हणून त्यांनी पेरू बागेची लागवड केली आहे. यातून त्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे.

ज्ञानेश्वर सांगतात की, चंदन लागवड करणे सोपं मात्र याची जोपासना करणे अवघड आहे. विशेषतः चंदनाच्या झाडाची तस्करी होत असल्याने याच्या लाकडाची चोरी होऊ शकते अशी भीती व्यक्त होते. यामुळे ज्ञानेश्वर आपली संपूर्ण चंदनाची बाग सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवणार आहेत. चंदनाच्या एका झाडापासून पंधरा किलोपर्यंतचे चंदन मिळते आणि त्यांना आपल्या एक एकर चंदनाच्या बागेतून 6,000 किलो चंदन मिळण्याची आशा आहे.

सध्या स्थितीला बेंगलोर मध्ये चंदनाच्या लाकडाला आठ हजार रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. हाच दर जर भविष्यात देखील कायम राहिला तर त्यांना या एक एकर शेतातून पाच कोटींची उत्पन्नाची अपेक्षा आहे. निश्चितच सर्व काही जर सुयोग्य पद्धतीने चालू राहील तर ज्ञानेश्वर यांना एका एकरातून पाच कोटींची कमाई होणार आहे. 

Advertisement