Farmer Success Story: 3 एकरवर फुलवली सीताफळाची बाग आणि मिळवले 4 लाख उत्पन्न! वाचा किशन जुन्ने यांचे बागेचे नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टींचा ध्यास घेणे व ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत, प्रयत्नांमधील सातत्य आणि अभ्यास पूर्ण रीतीने केलेली प्लॅनिंग खूप महत्त्वाचे असते.

हीच बाब शेती क्षेत्राला देखील लागू होते. शेतीमध्ये देखील तुम्ही कुठल्याही पिकाचे उत्पादन घ्यायचे ठरवले तरी ते तुम्हाला शक्य आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला त्या पिकासंबंधीची संपूर्ण माहिती, त्याच्या व्यवस्थापनातील खाचखळगे, लागणारी मेहनत व जिद्द इत्यादी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

तुमच्यात जर जिद्द असेल तर तुम्ही खडकातून देखील पाणी काढू शकतात अशा आशयाची एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच म्हणीला धरून जर आपण  नांदेड जिल्ह्यात असलेल्या कोकलेगावातील किशन जुन्ने या शेतकऱ्याचा विचार केला तर यांनी देखील माळरानावर असलेल्या पडीक जमिनीमध्ये सीताफळाची बाग यशस्वी करून दाखवली व लाखो रुपयांचे उत्पन्न सध्या ते घेत आहेत.

 माळरानावर फुलवली सीताफळाची बाग

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या कोकले गाव येथील शेतकरी किशन जुन्ने यांनी अक्षरशः पडीक असलेल्या माळराना वरील तीन एकर जमिनीवर सीताफळाचा प्रयोग केला व तो यशस्वी करून दाखवला आहे. शिक्षणात अवघे बारावी पर्यंत शिकलेले किशन यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला व  निर्णय घेतल्यानंतर फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला.

यासंबंधीचा विचार करत असताना त्यांनी सिताफळ लागवड करण्याचा निर्णय घेतला व तीन एकर क्षेत्रामध्ये बालानगरी या सिताफळाच्या वाणाची त्यांनी लागवड केली. त्यावेळी त्यांनी प्रति सीताफळाचे रोप 60 रुपये याप्रमाणे विकत घेतले व एक हजार आठशे रोपे त्यांनी नर्सरीतून आणले.

या बागेसाठी त्यांनी शेणखत व गांडूळ खताचा वापर केला व पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकची मदत घेतली. या बागेचे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केले व पहिल्याच वर्षी त्यांना एक लाख साठ हजार रुपयांचे उत्पन्न या माध्यमातून त्यांना मिळाले. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला व योग्य नियोजन करून त्यांनी दरवर्षी चांगले उत्पन्न मिळवण्यामध्ये सातत्य ठेवले आहे.

या सीझनमध्ये त्यांना तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तीन एकर लावलेल्या त्यांच्या या बालानगरी वाणाच्या  सीताफळाच्या बागेतून तब्बल सहाशे क्रेट इतके सीताफळाचे उत्पादन निघत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सीताफळांसोबत त्यांनी 12 फूट अंतरावर मोसंबी व पेरूची देखील लागवड केली असून येणाऱ्या कालावधीमध्ये त्यापासून देखील चांगले उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.

 सीताफळाची विक्री कशी केली जाते?

किशन जुन्ने यांनी पिकवलेल्या सिताफळाला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधून खूप चांगली मागणी आहे. या दोन्ही राज्यातील व्यापारी थेट त्यांच्या शेतात येऊन सीताफळाची खरेदी करतात.

अशा पद्धतीने योग्य अभ्यास व कष्ट करण्याची तयारी असेल तर माळरानावर देखील आपण फळ पिकांचे भरघोस उत्पादन घेऊ शकतो हे किशन जुन्ने यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.