Farmer Success Story:- सध्या नोकरी नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवक नोकऱ्यासाठी वणवण भटकताना आपल्याला दिसून येतात. परंतु आपल्याला समाजात असे देखील काही व्यक्ती दिसून येतात की चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून ते एखाद्या व्यवसायामध्ये उतरतात व यशस्वी देखील होतात.
ही गोष्ट पाहिजे तेवढी सोपी नाही. कारण स्थिर असलेला मार्ग सोडून बेभरोशाचा तसेच कुठल्याही पद्धतीने पुढील भविष्याचा अंदाज नसलेला मार्ग स्वीकारणे हे पाहिजे तेवढे सोपे नसते. परंतु तरीदेखील काही व्यक्ति हे धाडस करतात व यशस्वी होतात. त्यातल्या त्यात नोकरी सोडून शेती सारख्या व्यवसायामध्ये पडणे म्हणजे हा एक प्रकारचा जुगारच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
परंतु असे अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतील की बरेच जणांनी चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांना राम राम ठोकला आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन मिळवत यशाला गवसणी घातली. याच मुद्द्याला धरून जर आपण कर्नाटक राज्यातील रायचूर येथील गुढीपाडु अंजनेया या शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर ते काहीसे या मुद्द्याला साजेसे आहे.
ऑनलाइन आंबा विक्रीतून कमावले लाखो रुपये
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्नाटक राज्यातील रायचूर येथील गुढीपाडू अंजनेया नावाच्या शेतकऱ्याने डिप्लोमा पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले होते व बेंगलोर या ठिकाणी एका कंपनीत सात वर्षे नोकरी केली.सात वर्ष कंपनीत काम करून पैसा कमावला व त्यानंतर नोकरी सोडून स्वतःला शेतीमध्ये झोकून दिले.
अंजनेय यांनी फळबाग लागवड तसेच भाजीपाला व फुले व शोभेच्या वनस्पती वाढवण्याच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतले. त्याही पुढे जात त्यांनी ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून आंब्याची विक्री करणे सुरू केले व व्यवसायातून या शेतकऱ्याला खूप मोठा आर्थिक फायदा झाला.
कारण आंब्याच्या विक्रीसाठी बाजारात जाण्याची गरज नसल्यामुळे इतर खर्च कमी होऊन नफा जास्त मिळाला. गुढीपाडु अंजनेया यांनी दोनच महिन्यांमध्ये तब्बल १८०० किलो आंब्याची ऑनलाइन पद्धतीने विक्री केली. त्यांनी या ऑनलाइन पद्धतीने बंगनपल्ली तसेच केसरी हे आंबे विकले. या आंब्याच्या विक्रीतून त्यांना लाखो रुपयांचा नफा घरबसल्या मिळवता आला.
आता आहे विदेशात आंबा निर्यात करण्याचे उद्दिष्ट
ऑनलाइन आंबा विक्रीतून त्यांनी चांगला नफा मिळवला आहेच परंतु आता त्यांनी पुढचे पाऊल उचलत व्हाईट फिल्ड तसेच लालबाग येथे झालेल्या आंबा मेळाव्यामध्ये देखील सहभागी झाले होते. गुढीपाडू अंजनेय यांची ओळख आता कर्नाटक राज्यापूर्तीच मर्यादित नसून त्यांचे हे काम इतर राज्यांमध्ये देखील पसरले आहेत.
त्यांचा हा व्यवसाय आता लोकप्रियतेच्या शिखरावर असून ते आता आंबा विक्रीसाठी इतर काही देशांशी देखील व्यावसायिक पातळीवर संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्यासोबत या ऑनलाइन व्यवसायाकरिता इतर लोकांना देखील प्रोत्साहित केलेले आहे.
या सगळ्या गोष्टी करताना त्यांना अनेक समस्या आल्या व त्यावर मात करत त्यांनी चांगले यश मिळवले आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन पद्धतीने आंबा विक्री अगोदर त्यांनी मोसमी फळे आणि लिंबांची देखील ऑनलाईन पद्धतीने विक्री केलेली आहे.
अशा पद्धतीने जर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचे मदत घेऊन शेती व शेती संबंधित व्यवसाय केले तर व्यक्ती लाखो रुपये मिळवू शकतो हे गुढीपाडू अंजनेया यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.