Ganpati Darshan:- श्री.गणेश या देवतेला विघ्नहर्ता असे म्हटले जाते. सध्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचे धामधूम सुरू असून सगळीकडे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण तयार झाले असून या भक्ती रसात अनेक भक्तगण न्हावून निघत आहेत. प्रत्येक वर्षी आपण गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण हा जो काही कालावधी असतो हा खरच मनाला प्रसन्न करणारा आणि हवाहवासा असा वाटतो.
जसजशी गणेश विसर्जनाची तारीख जवळ येते तशी तशी मनातील हुरहूर वाढायला लागते व ज्या दिवशी गणेशाचे विसर्जन होते तेव्हा आपल्या घरातील कोणीतरी आपल्यापासून खूप दूर चालले आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून येते. इतके जवळचे नाते श्री गणेश आणि भक्तांचे असते. त्यामुळे या कालावधीत अनेकजण महाराष्ट्रात असलेले अष्टविनायक आणि इतर महत्वाच्या असलेल्या गणेश मंदिरांना भेटी देतात व दर्शन घेतात.

या अनुषंगाने जर आपण अष्टविनायका व्यतिरिक्त विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी देखील अष्टविनायकांना जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व विदर्भात असणाऱ्या गणपती मंदिरांना देखील आहे. भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारे श्री गणेश अशी या ठिकाणच्या अष्टविनायकांबद्दल भक्तांच्या मनात श्रद्धा आहे. त्यामुळे या लेखात आपण या गणेश मंदिरांविषयी माहिती घेणार आहोत.
विदर्भातील प्रसिद्ध गणेश मंदिर
1- पवनीचा पंचमुखी गणपती– विदर्भातील भंडारा जिल्ह्यात असलेल्या वैनगंगा नदीच्या तीरावर पवनी हे गाव आहे व या ठिकाणी हा गणपती आहे. या ठिकाणच्या गणपती मंदीराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मूर्ती नसून मंदिरामध्ये एक उभ्या स्थितीत पाषाण आहे व त्यालाच पाच तोंडे आहेत. या ठिकाणच्या गणपतीला भद्रा गणपती तसेच पंचानन किंवा विघ्नराज अशा विविध नावांनी देखील ओळखले जाते. हे मंदिर पालांदूर गावच्या श्रीहरी स्वामी जोशी यांनी बांधले असे म्हटले जाते.
2- शमी गणेश– आदासा– हे पुरातन मंदिर असून एका उंच टेकडीवर स्थापित आहे. या ठिकाणी नृत्य गणेशाची मूर्ती असून ती उजव्या सोंडेची आहे. या गणपतीविषयी एक आख्यायिका असून महापाप, संकष्ट आणि शत्रू या राक्षसांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर आणि पार्वती रुपी श्री गणेशाची आराधना केली व शमी झाडाच्या मुळांपासून शमी विघ्नेश प्रकट झाला व त्याने दानवांचा वध केला.
3- भ्रूशुंडं विनायक– विदर्भातील मेंढा या गावी वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर असून या ठिकाणी श्री गणेशाची आठ फुटाची मूर्ती असून आहे. या ठिकाणी गणेशाच्या पायाशी नागाचे वेटोळे व त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर गणपती विराजमान अशा पद्धतीची ही मूर्ती असून ती चतुर्भुज असून एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र आहे व मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग हा शिल्पीत केलेला दिसतो.
4- अठरा भुज रामटेक– नागपूर पासून 47 किलोमीटर असलेल्या रामटेक येथे हे सुंदर प्राचीन असे मंदिर असून या ठिकाणी 18 भुजा गजानन मंदिर आहे. अठरा विज्ञानाचे ज्ञान असलेला गणपती आणि 18 प्राप्तसिद्धीमुळे विघ्नेश्वर म्हणून येथे गणपतीची पूजा होते. हा उजवा सोंडेचा गणपती आहे व त्यामुळे त्याला सिद्धिविनायक म्हणून देखील ओळखले जाते.
5- नागपूरचा टेकडी गणेश– नागपूर शहरातील टेकडी गणपती हा खूप प्रसिद्ध गणपती असून या ठिकाणची मूर्ती उजव्या सोंडेची आहे व ही स्वयंभू मूर्ती 12 व्या शतकातील यादवकालीन आहे. नागपूरचा टेकडी गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे सचिन तेंडुलकर सह अनेक सेलिब्रिटींचा हा गणपती श्रद्धास्थान आहे. एक मोठा सभागृहासारखा या मंदिराचा गाभारा आहे व या ठिकाणी मध्यभागी एक झाड आहे व त्याखाली श्री गणपतीची मूर्ती आहे.
6- वरदविनायक,भद्रावती– चंद्रपूर जिल्ह्यातील गौराळा या भद्रावती तालुक्यातील गावात वरद विनायकाचे मंदिर असून हे सोळा खांबांचा भव्य सभा मंडप असलेले मंदिर आहे. या ठिकाणी काही पायऱ्या तुम्ही उतरून गेल्यास खाली आठ फुटांची मूर्ती आहे व या मूर्तीच्या मस्तकाभोवती प्रभामंडळ कोरले असून त्यावर मुकुट आहे.
7- चिंतामणी,कळंब– यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे चिंतामणी मंदिरात पंधरा फूट जमिनीखाली ही मूर्ती असून त्या जमिनीखाली पाण्याचे प्रवाह वाहतात. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात गणेश मूर्तीच्या पायाला पाणी लागले की ते पाणी पुन्हा ओसरते व हा प्रसंग बारा वर्षातून फक्त एकदाच घडतो.
8- केळझरचा वरदविनायक– नागपूर आणि वर्धा या मार्गावर सुमारे 25 किलोमीटर अंतरावर केळझर किल्ला आहे व या किल्ल्यावरच हे प्राचीन मंदिर आहे. पांडवांनी जेव्हा बकासुराचा वध केला होता तेव्हा या वधानंतर गणपतीची स्थापना केली अशी या ठिकाणीची श्रद्धा आहे. केळझरच्या वरद विनायकाला एकचक्रा गणेश म्हणून देखील ओळखले जाते.