Genealogy:- वंशावळ हा शब्द आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. खासकरून आता सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून जी काही कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत त्या कुणबी पत्रांसाठी वंशावळ हे कागदपत्र नक्कीच लागते. एकंदरीत तुम्हाला जातीचा दाखला काढायचा असेल तर त्याकरिता अर्ज करताना आपल्याला जे काही तर आवश्यक कागदपत्र असतात त्यासोबत वंशावळीचा दाखला जोडणे गरजेचे असते. वंशावळीशिवाय जातीचा दाखला मिळणे जरा कठीण असते. या अनुषंगाने या लेखामध्ये वंशावळ म्हणजे नेमके काय किंवा तिचे फायदे काय? इत्यादी महत्त्वाची माहिती या लेखात बघू.
वंशावळ म्हणजे नेमके काय?
जर अगदी सरळ आणि समजणाऱ्या भाषेत वंशावळ म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचे असेल तर ते म्हणजे आपले जे काही पूर्वज असतात त्यांचा इतिहास म्हणजेच वंशावळ असे आपल्याला म्हणता येईल. यामध्ये आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती नमूद केलेली असते.
यामध्ये साधारणपणे प्रत्येक व्यक्तीचे नाव आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंत क्रमाने उतरत्या स्वरूपात लिहिलेले कागदपत्राला वंशावळ असे म्हणतात. साधारणपणे खापर पणजोबा किंवा आजोबांपासून तर आपल्यापर्यंत ही नावे आपण लिहू शकतो. याला इंग्रजीमध्ये ट्री डायग्राम किंवा फॅमिली ट्री डायग्राम असे देखील म्हणतात.
वंशावळ कशी काढली जाते?
आपल्या पूर्वजांपासून तर आतापर्यंतच्या आपल्या पिढीतील व्यक्तींची नावे उतरत्या क्रमाने लिहिणे हे वंशावळ काढण्यासाठी गरजेचे असते. यामध्ये साधारणपणे खापर पणजोबा तसेच त्यानंतर पणजोबा, आजोबा अशा क्रमाने नाव लिहिणे गरजेचे असते. त्यानंतर आजोबांची मुले, आजोबांच्या मुलांची मुले असा साधारणपणे उतरत्या क्रमाने हा क्रम लिहिणे गरजेचे असते. समजा जर जातीचा दाखला काढायचा असेल तर ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहिणे गरजेचे असते.
वंशावळ कुठल्या कागदपत्रांमध्ये आपल्याला मिळू शकते?
वंशावळीचे रेकॉर्ड हे साधारणपणे तहसील कार्यालयात जे काही जुने हक्क नोंदणी असतात यामध्ये आढळते. तसेच कोतवाल बुकमध्ये देखील जन्ममृत्यूची नोंदवही असते व त्या ठिकाणी कुटुंबाच्या पूर्वजांचा इतिहास आपल्याला मिळतो. तसेच पूर्वजांच्या जातीचा जुन्या शैक्षणिक नोंदीमध्ये देखील उल्लेख आढळत असतो. एखाद्या वेळेस जर आपले आजोबा शिक्षित असतील व त्यावेळी त्यांनी जातीचे नोंद केलेली असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला नोंद आढळून येत असते.
वंशावळीचा फायदा काय?
जर आपण आताचे नियम पाहिले तर आपली जन्म नोंद किंवा नावासमोर आपली जात लिहिली जात नसते. त्याऐवजी फक्त आडनावाचा उल्लेख केलेला असतो. परंतु शाळा कॉलेजमधील प्रवेश घ्यायचा असेल तर जातीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना लागते व ते प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला जुन्या रेकॉर्डचा आधार घेणे गरजेचे असते. कारण ज्या काही जुन्या नोंदी होत्या त्या नोंदीमध्ये नावासमोर जातीचा उल्लेख हा केलेला असायचा. तसेच तुम्हाला कास्ट व्हॅलेडीटी अर्थ जात पडताळणीसाठी देखील वंशावळीची आवश्यकता भासते.
वंशावळ कोण काढते?
साधारणपणे वंशावळ ही अर्जदाराला स्वतः काढावी लागते. वंशावळ अर्जदाराला स्वतः लिहायचे असते. साधारणपणे सोप्या भाषेत समजावून घेतले तर वंशावळ काढण्याची जबाबदारी ही अर्जदाराची स्वतः असते. यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नसते.