Health Tips:-सणासुदीच्या कालावधीमध्ये बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर फराळ किंवा इतर पदार्थ खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे बऱ्याच जणांना ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास व्हायला लागतो. खास करून या प्रकारची समस्या ही शरद ऋतूमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.
साधारणपणे पावसाळा संपल्याच्या कालावधीनंतर जो ऋतू किंवा कालावधी येतो त्याला शरद ऋतू म्हणून संबोधले जाते. नेमके या कालावधीत ऍसिडिटी किंवा त्वचेच्या समस्या, शरीरात जळजळ होणे किंवा पित्त दोष इत्यादी अनेक समस्या उद्भवतात
. त्यामुळे या कालावधीत होणाऱ्या या समस्या टाळण्या करता तुम्हाला योग्य आहार घेणे गरजेचे असते. या कालावधीमध्ये जर मसालेदार तसेच तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन जास्त केले तर पित्त वाढण्याची शक्यता असते व ऍसिडिटीचा त्रास देखील वाढू शकतो.
अशा पद्धतीने घ्या आहार आणि मिळवा ऍसिडिटी व पित्तापासून मुक्तता
1- थंड पदार्थांचे सेवन– शरद ऋतूमध्ये तुम्हाला जर पित्त नियंत्रणामध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही थंड आणि पचायला सोपे पदार्थ खाणे खूप महत्त्वाचे आहे. या कालावधीमध्ये तुम्ही ताज्या फळांचे रस तसेच नारळ पाणी, दूध किंवा दही सारखे थंड पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावेत. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते व पित्त शांत ठेवण्यास मदत होते.
2- तुपाचा वापर– तुप हे प्रामुख्याने आयुर्वेदात पित्त संतुलित करण्यासाठी उत्कृष्ट मानले जाते. या कालावधीमध्ये तुम्ही जर तुपाचा वापर आहारात केला तर पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते व शरीरात शितलता आणते.तूप खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते व त्यामुळे ऍसिडिटी व इतर पित्तजन्य समस्या टळतात.
3- मसालेदार आणि तिखट पदार्थ कमी करणे– शरद ऋतू मध्ये तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ले तर पित्त वाढते व त्यामुळे या कालावधीमध्ये मसालेदार पदार्थ कितीही चविष्ट असले तरी कमी तिखट पदार्थ खाण्याचा प्रयत्न करावा.
तसेच या कालावधीमध्ये मिरच्या तसेच आले व मसालेदार पदार्थ यांचा आहारात कमीत कमी समावेश करावा.जर हे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केले तर पित्ताचे असंतुलन वाढते व ॲसिडिटी तसेच पित्ताचा त्रास होतो.
4- आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करणे– शरद ऋतूमध्ये तुम्हाला पित्त संतुलित ठेवायचे असेल तर तुम्ही आहारात ताजी फळे आणि भाज्या यांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही काकडी तसेच पपई,
मोसंबी तसेच संत्र्या इत्यादी फळांचे सेवन केले तर पित्त नियंत्रित राहण्यासाठी यांची मदत होते. यामध्ये शितलता आणणारे घटक असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
5- तुळस आणि पुदिनाचा वापर– पित्त दोष कमी करण्याकरिता पुदिना आणि तुळस हे अत्यंत प्रभावी मानले जातात. तुळस ही पचनक्रियेला मदत करते व त्यामध्ये पुदिनाचा रस किंवा त्याची पाने आहारात समाविष्ट केली तर पित्त दोष नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो.
शरद ऋतूमध्ये प्रामुख्याने पित्त दोष मोठ्या प्रमाणावर वाढतो. परंतु यामध्ये तुम्ही आहाराचे योग्य नियोजन केले तर पित्त व ऍसिडिटी नियंत्रणात ठेवता येते.