Hill Station In India: हिल स्टेशनला भेट द्यायची तर कशाला शिमला आणि मसूरी? ‘ही’ आहेत भारतातील छुपी हिल स्टेशन! स्वित्झर्लंडला गेल्याचा येतो फील

Ajay Patil
Published:

Hill Station In India:- बरेच व्यक्ती उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत किंवा पावसाळ्यामध्ये कुटुंब किंवा मित्रांसमवेत दररोजच्या धकाधकीच्या जीवनापासून मनाला शांतता मिळावी म्हणून ट्रीप प्लान करतात. अशा ट्रीपमध्ये बऱ्याचदा थंड हवेचे ठिकाणे, पावसाळ्याच्या कालावधी असेल तर ज्या ठिकाणी उंचच उंच धबधबे तसेच हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आहेत अशा ठिकाणी किंवा उंच उंच अशा हिल स्टेशनला भेट देतात.

हिल स्टेशनच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतामध्ये जास्त करून शिमला,मनाली, मसूरी इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. परंतु या ठिकाणी असलेल्या गर्दीमुळे बऱ्याचदा आपल्याला मनाला हवी असलेली शांतता मिळणे कठीण होते.

त्या व्यतिरिक्त तुम्ही भारतातील अशी काही हिल स्टेशन आहेत की ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून या ठिकाणी तुम्हाला निसर्ग सौंदर्याचा आनंद तर घेता येतोच परंतु त्यासोबत मानसिक शांतता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून देखील फायद्याचे ठरते. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा तीन हिल स्टेशन बद्दल माहिती घेणार आहोत जे अजून देखील हवे तितक्या प्रमाणात पर्यटकांना माहिती नाहीत.

ही आहेत भारतातील छुपी आणि प्रसिद्ध हिल स्टेशन

1- कनाटल- उत्तराखंड राज्यामध्ये कनाटल हिल स्टेशन असून या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर तुमची सुंदर हिल स्टेशनची शोधमोहीम या ठिकाणी थांबू शकते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निसर्गाची उधळण असून नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेण्यासोबत तुम्ही अगदी शांततेत गर्दीपासून दूर आरामशीर वेळ या ठिकाणी घालवू शकतात. या ठिकाणी तुम्ही कॅम्पिंग तसेच ट्रेकिंग देखील करू शकतात. कनाटल हिल स्टेशन हे डेहराडून पासून 78 किलोमीटर अंतरावर असून मसुरी पासून 38 किलोमीटर अंतरावर आहे.

कनाटल हिल स्टेशनला कसे जाता येईल?

तुम्हाला देखील या ठिकाणी जायचं असेल तर डेहराडून या ठिकाणाहून तुम्ही बसने देखील जाऊ शकतात किंवा मसूरी वरुन जायचे असेल तर त्या ठिकाणहून टॅक्सी किंवा लोकल बसने जाता येते.

2- शांगड गाव- हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या कुल्लू जिल्ह्यात शांगड हे सुंदर गाव असून या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर या ठिकाणाची दृश्य तुम्हाला स्वित्झर्लंड सारखी भासतात. त्यामुळेच शांगडला भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते.

या ठिकाणी असलेले पाईन वृक्षाची झाडे तसेच हिरवीगार वनराई आणि रंगबिरंगी घरे पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरतात. या ठिकाणी नैसर्गिक ठिकाणांशिवाय शांगचुल महादेव मंदिर, बरसनगड धबधबा आणि लाकडी बुरुज मंदिर आहे.

शांगड गावाला कशी भेट द्याल?

या ठिकाणी जायचे असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणहुन तुम्ही याल तिथून तुम्हाला अगोदर अंबाला, चंदीगड किंवा जोगिंदर नगर रेल्वे स्टेशनला यावे लागेल व त्या ठिकाणाहून तुम्ही रस्त्याने मनालीला जाऊ शकता. मनाली वरून तुम्ही मनाली ते सैंज लोकल बसने या ठिकाणी जाऊ शकतात. किंवा जर तुम्ही फ्लाटने कुल्लू विमानतळावर पोहोचले तर त्या ठिकाणाहून भंतार व भंतारहुन सैंज पर्यंत बसने किंवा टॅक्सीने जाता येते.

3- कलगा गाव- बऱ्याच व्यक्तींना पर्यटनामध्ये ट्रेकिंगची आवड असते व तुम्हाला देखील अशा प्रकारची आवड असेल तर तुमच्यासाठी कलगा गाव हे चांगला पर्याय ठरेल. या ठिकाणी असलेल्या कलगा- बनबुनी- खीरगंगा ट्रॅक हा उत्तम पर्याय आहे.

28 किलोमीटर लांबीचा हा ट्रॅक असून हा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे तीन दिवस लागण्याची शक्यता असते. हे ठिकाण हिमाचल प्रदेश मधील कुल्लू जिल्ह्यातील पार्वती खोऱ्यातील पुलगा धरणाजवळ आहे. ट्रेकिंग व्यतिरिक्त या ठिकाणच्या टेकडीच्या माथ्यावर जाऊन तुम्ही मणिकरण व्हॅलीचे दृश्य पाहू शकतात. तसेच या ठिकाणाहून सूर्यास्ताचे अप्रतिम असे सुंदर दृश्य पाहता येते.

कलगा गावाला कसे जाता येईल?

तुम्हाला जर कलगा या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला फ्लाईटने किंवा रस्ते मार्गाने कुल्लू जिल्ह्यात असलेल्या भुंतर या ठिकाणी पोहोचावे लागेल. मनिकरण हे विमानतळापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे व या ठिकाणी बस व टॅक्सी उपलब्ध असून मनिकरण पासून कलगा दहा किलोमीटर अंतरावर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe