कष्ट आले फळाला ! ऊसतोड कामगाराची एक मुलगी बनली इंजिनियर ; दोन मुली बनणार एमबीबीएस

Hingoli News : शिक्षण हे वाघिणीच दूध. शिक्षणाशिवाय तळागाळातील समाजाची प्रगती अशक्य. मात्र, शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी त्या तळागाळातील समाजाला देखील पुढे यावं लागेल. केवळ शासन किंवा प्रशासन किंवा इतर समाजकारणातील आणि राजकारणातील घटक त्या तळागाळातील लोकांना क्षणासाठी प्रेरित करू शकत नाहीत.

त्या मागासलेल्या, रंजलेल्या समाजाला उठून लढावं लागेल. जर हा तळागाळातील समाज आपोहून पुढे आला हातात कलम घेतली तर नक्कीच इतिहास घडवेल. हिंगोली जिल्ह्यातही असंच एक उदाहरण समोर आल आहे. जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याच्या मौजे भुरक्याची वाडी येथील एका ऊसतोड कामगाराच्या लेकींनी इतिहास घडवायला सुरुवात केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहेबराव भुरके असं या ऊसतोड कामगाराचे नाव. साहेबराव व त्यांच्या सौभाग्यवती सहा सहा महिने घरापासून दूर ऊसतोड करण्याला जातात. मात्र, हातावर पोट असणाऱ्या या अवलियाने आपल्या मुलींना चांगलं शिक्षण देण्याचं ठरवलं. यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा दिला आणि पैशांची साठवणूक करत मुलींना उच्च शिक्षणासाठी पैसे पाठवलेत. मुलींनी देखील बापाच्या आणि आईच्या कष्टाची जाण ठेवली.

आता एक मुलगी सिव्हिल इंजिनियर झाली असून दोन एमबीबीएससाठी पात्र झाल्या असून शिक्षण घेत आहेत. निश्चितच या तिन्ही मुलींनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची चीज केली आहे. ज्यांना साधं लिहिता-वाचता येत नाही, त्या अशिक्षित आई-वडिलांनी मुलींना उच्च शिक्षण देऊन निश्चितच वाखाणण्याजोगे काम केले असून मुलींनी देखील शिक्षणात नेत्र दीपक अशी कामगिरी करून आपले व आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल केले आहे.

सध्या या कुटुंबाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. खरं पाहता, साहेबराव हे अशिक्षित असून अगदी तरुण वयापासून ऊसतोड कामगार आहेत, त्यांच्या पत्नी देखील त्यांच्या जोडीला ऊस तोडीचे काम करतात. त्यांना एकूण तीन मुली आणि एक मुलगा आहे. ते अशिक्षित असल्याने आणि हातावर पोट असलेल्या लोकांना किती कष्ट घ्यावे लागतात याची जाण असल्याने त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचे हे ठरवले आणि वेळ प्रसंगी पोटाला चिमटा देत त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला आहे.

आता, साहेबराव यांनी केलेल्या कष्टाला फळ आल आहे. त्यांची मुलगी राणी साहेबराव भुरके हिने नांदेड येथून एमजीएम महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून आता ती अभियंता बनली आहे. दुसरी मुलगी मोनिका 2020 21 मध्ये नांदेड येथील एमबीबीएस कॉलेजसाठी पात्र ठरली असून मेडिकलचे शिक्षण घेत आहे. तिसरी मुलगी सोनम लातूर येथील एमबीबीएस कॉलेज साठी पात्र ठरली आहे.

त्यांचा मुलगा लहान असून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. निश्चितच लेखणीमध्ये एवढी धमक आहे की ती तळागाळातील समाजाला देखील शीर्षस्थानावर नेऊन ठेवू शकते. एका ऊसतोड कामगाराने पाहिलेलं स्वप्न आज त्यांच्या लेकींनी सत्यात उतरवून दाखवल आहे. निश्चितच मागास समाजाला पुढे आणण्यासाठी असा एक साहेबराव आणि अशा साहेबरावाच्या तीन लेकी अन लेक जन्माला येणे अति आवश्यक आहे.