प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे हे प्राथमिक स्वरूपात स्वप्न असते. कारण माणसाची भावना आणि घराचे स्वप्न हे एकमेकांशी निगडित अशा बाबी आहेत. त्याच्यामुळे आताच्या तरुण-तरुणी नोकरी मिळताच घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याला विशेष प्राधान्य देतात. खास करून अशा प्रकारचा ट्रेंड मोठ्या शहरांमध्ये दिसून येतो.
कारण आता बँकांच्या माध्यमातून घर खरेदीसाठी मिळणारे होमलोन देखील सहजरित्या उपलब्ध होते व आपल्याकडे असणारी बचत ही डाऊन पेमेंटमध्ये गुंतवली की घराचे स्वप्न पूर्ण करता येते. परंतु यामध्ये लोन घेऊन जर घर घ्यायचे असेल तर त्या अगोदर चार गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेणे फायद्याचे ठरते.
कारण होमलोन घेऊन घर तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. यामध्ये जर तुमचा एक निर्णय चुकला तर त्याचा परिणाम तुम्हाला बरेच दिवस भोगावा लागू शकतो. त्यामुळे या लेखात आपण होम लोन घेऊन घर खरेदी करताना प्रामुख्याने कोणत्या गोष्टींचा विचार करावा आणि किती पगार असेल तर होमलोन घेऊन घर घ्यावे? त्याबद्दलची माहिती बघणार आहोत.
होमलोन घेऊन घर घ्या,परंतु आधी या गोष्टींचा विचार करा
1- तुमचा महिन्याचा पगार– सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण होमलोन घेतो तेव्हा त्याचे ईएमआय म्हणजेच प्रत्येक महिन्याला आपल्याला हप्ते भरावे लागतात. परंतु ही हप्त्याची रक्कम तुमच्या मासिक उत्पन्नाच्या म्हणजेच पगाराच्या 20 ते 25 टक्के असेल तरच होमलोन घेणे फायद्याचे ठरते. उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा तुमचा पगार एक लाख रुपये असेल व तुम्हाला प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांचा होमलोनचा हप्ता असेल तर तुम्ही तो आरामात भरू शकता.
परंतु जर 50 ते 70 हजार रुपयांपर्यंत पगार असेल आणि तुम्ही होम लोन घेऊन घर विकत घेत असाल तर त्याचा हप्ता प्रत्येक महिना पंचवीस हजार रुपये असेल तर हा निर्णय आर्थिकदृष्ट्या चुकीचा समजला जातो. कारण होमलोन हे कमीत कमी वीस वर्षाच्या कालावधी करिता आपल्याला घ्यावे लागते व तितक्या कालावधीपर्यंत ते परतफेड करावे लागते.
त्यामुळे तुमच्या पगाराच्या फक्त 25% कर्जाचा हप्ता असेल तरच तुम्ही होमलोन घेऊन घर घ्यावे. जर पगार 50 हजारापर्यंत असेल तर भाड्याच्या घरात राहून पैशांची बचत करणे गरजेचे आहे व भविष्यकाळात जर तुमचा पगार वाढला तर तुम्ही केलेल्या बचतीतून जास्तीचे डाऊनपेमेंट करून घर खरेदी करू शकतात. त्यामुळे तुम्हाला असा एक फायदा होईल की जास्त डाऊनपेमेंट जर तुम्ही केले तर हप्ता तुम्हाला कमी राहील.
2- तुमच्या नोकरीची स्थिती किंवा जॉब प्रोफाइल बघणे– प्रत्येकाने याबाबत गरजेनुसार निर्णय घेणे फायद्याचे ठरते. होम लोन घेण्याअगोदर तुम्ही तुमचे जॉब प्रोफाइल नेमकी काय आहे? याचा सारासार विचार करूनच निर्णय घेणे फायद्याचे ठरते. समजा तुम्ही ज्या शहरांमध्ये घर घेतले तर तुम्ही त्या शहराशी बांधले जातात.
परंतु भविष्यकाळात करिअरच्या वाढीमुळे बहुतेक लोकांना सुरुवातीच्या टप्प्यात एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. परंतु आपल्याला यामध्ये असे दिसून येते की काही लोकांनी जर सुरुवातीच्या टप्प्यातच एखाद्या शहरांमध्ये घर घेतले आणि नोकरी बदलण्याची परिस्थिती आली तर समोरच्या व्यक्तीची नोकरी बदलण्याची स्थिती राहत नाही.
कारण या शहरातले स्वतःचे घर सोडून दुसऱ्या शहरात भाड्याच्या घरात राहणे व भाडे देणे योग्य वाटत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर सुरक्षित नोकरी नसेल तर घाई गडबडीने घर खरेदी करू नये.
3- घर किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर मालमत्तेची निवड योग्य पद्धतीने करा– तुम्हाला घर घ्यायचेच असेल तर तुम्ही अगोदर निश्चितपणे मालमत्ता निवडणे गरजेचे आहे. समजा तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल तर भाडे चांगले असेल अशा ठिकाणी तो खरेदी करावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी फ्लॅटच्या किमतीत प्रत्येक वर्षाला कमीत कमी आठ टक्क्यांनी वाढ होईल अशा ठिकाणी फ्लॅट घ्यावा.
जेणेकरून ज्या पद्धतीने महागाई वाढत जाईल त्या पद्धतीने तुमच्या फ्लॅटची किंमत देखील वाढायला हवी. याकरिता घेतलेल्या होमलोनची परतफेड जेव्हा तुम्ही वीस वर्षांनी पूर्ण कराल तेव्हा तुमच्या फ्लॅटची किंमत ही तुमच्या खरेदी किंमतीच्या किंमत तिप्पट होईल अशा ठिकाणी फ्लॅट किंवा घर खरेदी करावे.
4- रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर– तुम्हाला जर रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल व या दृष्टिकोनातून तुम्हाला फ्लॅट खरेदी करायचा असेल तर फ्लॅट खरेदी करणे ऐवजी टियर 2 किंवा टिअर 3 शहरांमध्ये जमीन लिंक्ड घर खरेदी करणे चांगले होईल किंवा जमीन खरेदी करणे कधीही फायद्याचे ठरेल.
कारण फ्लॅटपेक्षा जमिनींनी नेहमी चांगला परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत फ्लॅट खरेदी करणे हा एखाद्या वेळेस तोट्याचा व्यवहार होऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही जर जमीन खरेदी केली तर तुम्हाला परतावा देखील चांगला मिळू शकतो किंवा तुम्ही त्यावर तुमच्या इच्छेनुसार घर देखील बांधू शकता.
त्यामुळे होमलोन घेऊन घर घेण्याआधी तुमचे स्वतःची गरज आणि आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेणे फायद्याचे ठरते.