तुमच्याकडे पैसे आहेत व त्यांची गुंतवणूक तुम्हाला करायची आहे. परंतु गुंतवणूक करताना मात्र तुम्हाला परतावा चांगला हवा आहे आणि रिस्क देखील मुळीच नको आहे तर तुमच्याकरिता काही सरकारी योजना महत्त्वाच्या ठरतात.
कारण गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या पर्यायाची म्हणजेच योजनेची निवड करणे हे आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून पहिली पायरी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण तुमची आजची गुंतवणूक ही तुमच्या आयुष्याच्या उतार वयातील समृद्ध आर्थिक आयुष्याची गुरुकिल्ली असते.
त्यामुळे तुम्ही जर आज गुंतवणूक सुरू करत असाल तर तुमच्या उतारवयात तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने पैसा असावा अशा पद्धतीने गुंतवणूक पर्याय निवडणे देखील तितकेच गरजेचे असते.
या अनुषंगाने जर बघितले तर आपण या लेखामध्ये अशी एक योजना बघणार आहोत जी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीवरील रिस्क न घेता चांगला परतावा मिळवून देऊ शकते व या योजनेचे नाव आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना होय. आता या योजनेचे नाव जवळपास सगळ्यांना माहिती आहे.
या योजनेत तुम्ही वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात व सध्या या योजनेवर 7.1 टक्क्यांनी व्याज मिळत आहे. या योजनेत तुम्हाला जर दोन कोटींपेक्षा अधिक निधी जमवायचा असेल तर तो तुम्ही कसा जमवू शकता? याबद्दलची माहिती बघू.
पीपीएफ योजनेत या पद्धतीने जमतील दोन कोटी 26 लाख 97 हजार 857 रुपये
पीपीएफ स्कीम ही पंधरा वर्षात परिपक्व होते. परंतु तुम्ही ती दर पाच वर्षांसाठी वाढवू शकतात. या योजनेमध्ये तुम्हाला जर दोन कोटी पेक्षा जास्तीची रक्कम जमा करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला या योजनेत दीड लाख रुपये जमा करावे लागतील.
त्यानंतर तुम्हाला ती स्कीम पाच पाच वर्षांसाठी जवळपास चार वेळा वाढवावी लागेल. अशा पद्धतीने पंधरा वर्षाच्या या योजनेची मुदत चार वेळा पाच पाच वर्षांसाठी वाढवल्यामुळे ती 35 वर्षांची होईल.
अशाप्रकारे 35 वर्षात तुम्ही एकूण 52 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक कराल. परंतु तुम्हाला या रकमेवर एक कोटी 74 लाख 47 हजार 857 रुपये व्याज म्हणून मिळतील.
समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी अशा पद्धतीने गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक करत तुम्ही 35 वर्षापर्यंत ही गुंतवणूक सुरू ठेवली तर वयाच्या साठाव्या वर्षी तुमच्याकडे दोन कोटी 26 लाख 97 हजार 857 रुपये रिटायरमेंट फंड जमा असेल.