कधीकधी निसर्गामध्ये एवढ्या अचंबित करणाऱ्या घटना घडतात की आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. सामान्य परिस्थितीपेक्षा काहीतरी असामान्य निसर्गामध्ये घडते व अशावेळी प्रत्येक जण आश्चर्यचकित होतात.तसे पाहायला गेले तर निसर्गामध्ये अशा अनेक विलक्षण आणि अचंबित करणाऱ्या घटना घडत असतात. ज्याचा आपण कधी विचार देखील करू शकत नाही. अशा घटनांना कधी कधी दैवी चमत्कार किंवा निसर्गाचा चमत्कार असल्याचे आपण संबोधतो.
परंतु या घटनांमध्ये दैवी चमत्कार असो किंवा नैसर्गिक चमत्कार परंतु या घटना नक्कीच आश्चर्याचा झटका देतात हे मात्र निश्चित. अगदी असाच दैवी चमत्कार म्हणा किंवा नैसर्गिक चमत्कार असलेली घटना नगर जिल्ह्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी घडली आहे.
गायीने दिला दोन तोंडाच्या वासराला जन्म
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आश्वि बुद्रुक येथे एका शेतकऱ्याच्या दुसऱ्या वेतात गाईने चक्क दोन तोंड असलेल्या वासराला जन्म दिला असून या वासराचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही तोंड एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत. या वासराला दोन तोंडे असली परंतु एक नाक तसेच चार कान आणि दोन जबडे अशी याची शरीर रचना आहे.
त्यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय झाला असून या अनोख्या वासराला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. आश्वि बुद्रुक येथील शेतकरी व दूध उत्पादक असलेले संजय म्हसे यांचा पशुपालनाचा व्यवसाय असून त्यांच्याकडे असलेल्या जर्सी गाईने तिच्या दुसऱ्या वेतात मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान दोन तोंडाच्या वासराला जन्म दिला असून हे दुर्मिळ वासरू असल्यामुळे पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे.
अशा पद्धतीच्या वासराला जगवणे मोठे आवाहन
दोन तोंडाच्या वासराचा जन्म तर झाला परंतु हे वासरू जगेल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या वासराला जन्मानंतर जगवणे हे खूप मोठे जीकीरीचे असते. तसेच हे वासरु जन्माला आल्यानंतरच अशक्त असल्यामुळे ती किती दिवस जगेल याचा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच या वासराला दोन तोंडे असून ते विरोधी बाजूला असल्यामुळे जास्त असलेल्या या डोक्याचे वजन या वासराला मानवेल का?
हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या त्याच्या या शरीराच्या ठेवणमुळे त्याला नीटसे उभे देखील राहता येणे शक्य नाही. या वासराला साहजिकच चार कान दोन जबडे आहेत परंतु नाक एकच आहे. त्यामुळे अगदी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने जन्मलेल्या या वासराला पाहण्यासाठी बघ्यानी गर्दी केलेली आहे.
अशा वासराच्या जन्माबद्दल काय म्हणतात पशुचिकित्सक?
अशा वैशिष्ट्यपूर्ण रीतीने जन्मलेल्या या वासराच्या बद्दल पशु चिकित्सकांनी देखील महत्वाची माहिती दिलेली आहे. त्यांच्या मते अनुवंशिक विकारांमुळे तसेच हवामान, आईच्या जीन्समध्ये गर्भधारणा होण्याच्या वेळेस काहीतरी बदल झाल्यामुळे अशा प्रकारची वासरे हे जन्माला येण्याची शक्यता असते.