Inspirational Story:- समाजामध्ये राहत असताना आपण असे अनेक व्यक्ती बघतो की ते खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु आज आपल्याला त्यांचे यश दिसते परंतु जर सुरुवातीपासून त्यांचा प्रवास पाहिला तर तो अनेक प्रकारच्या अडचणींनी आणि संकटांनी गच्च भरलेला असतो.
परंतु असे व्यक्ती ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याकरिता येणाऱ्या अडचणींना व संकटांना काडीमात्र थारा न देता अडचणीशी दोन हात करतात व मात मिळवत यशाच्या दिशेने मार्गक्रमण करतात व मोठ्या प्रमाणावर यश संपादन करतात. अगदी याच मुद्द्याला धरून आपण जगभरात प्रसिद्ध असलेले भारतीय एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांची यशोगाथा पाहिली तर आपल्याला वरील मुद्दा पटेल.
सुनील भारती मित्तल यांची यशोगाथा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येणाऱ्या अडीअडचणींना सामोरे जात व अशा अडचणींशी दोन हात करत भारतीय एअरटेल चे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी अनन्यसाधारण यश मिळवले आहे.आज भारतातील टेलिकॉम कंपन्यांचा विचार केला तर यामध्ये रिलायन्स जिओ अग्रस्थानी आहे व या कंपनीची खरी स्पर्धा ही भारती एअरटेल सोबतच आहे.
जर आपण रिलायन्स जिओचा विचार केला तर साधारणपणे 2016 मध्ये टेलिकॉम क्षेत्रामध्ये या कंपनीने धमाकेदार आणि जोरदार एंट्री केली होती. जिओ ने एन्ट्री केल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रातील अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. परंतु अजून देखील जिओला खरी टक्कर एअरटेल सक्षमपणे देत आहे व एअरटेलची ग्राहकांची फळी आज देखील तेवढ्याच मजबूतपणे उभी आहे.
जर आपण सुनील भारती मित्तल यांचा परिचय पाहिला तर त्यांचा जन्म आहे 23 ऑक्टोबर 1957 रोजी पंजाब राज्यातील लुधियाना या ठिकाणी झाला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजकीय होती. त्यांच्या वडिलांचे नाव सतपाल मित्तल होते व ते पंजाब राज्यातील प्रसिद्ध राजकारणी व दोन वेळा खासदार देखील राहिलेले आहेत. सुखवस्तू घराण्यामध्ये जन्म झाला असला तरी सुनील मित्तल यांना जीवनामध्ये कष्ट करून यश मिळवायचे होते व त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केले.
त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर सुरुवातीचं शिक्षण त्यांनी मसूरी या ठिकाणाच्या बिनबर्ग स्कूलमधून पूर्ण केले. त्यांनी मोठमोठ्या शाळा कॉलेजमधून शिक्षण घेतले परंतु त्यांचा अनुभव असा होता की मोठ्या शाळा आणि कॉलेजमधून जे आपल्याला शिकता येत नाही ते आपल्याला बाहेरच्या जगातून शिकता येते. प्रवासामध्ये त्यांनी राजकीय पार्श्वभूमी असताना देखील राजकारणात न येता व्यवसाय करण्याचे ठरवले व स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरिता त्यांनी त्यांच्या वडिलांकडून 20 हजार रुपये घेतले व सायकलचा व्यवसाय सुरू केला. जेव्हा त्यांनी सायकलच्या व्यवसायामध्ये प्रवेश केला तेव्हा हिरो सायकलचे मालक आणि व्यवस्थापक ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्याशी त्यांची ओळख झाली व जवळीक देखील वाढली.
या व्यवसायामध्ये देखील त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला परंतु न डगमगता अडचणीवर मात करत त्यांनी व्यवसायामध्ये चांगला आर्थिक नफा मिळवला. परंतु भविष्यातील विचार केला तर खूप चांगली संधी सायकल व्यवसायात दिसत नसल्यामुळे ते वेगळ्या व्यवसायाच्या शोधात होते.
अशी केली एअरटेलची सुरुवात
जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये मोबाईल फोन तंत्रज्ञान साधारणपणे 1990 नंतर आले व 1992 मध्ये सरकारने मोबाईल नेटवर्क परवाने देणे सुरू केले. याच दरम्यान सुनील भारती मित्तल यांची भारतीय सेल्युलर लिमिटेड ही कंपनी देखील या लिलावामध्ये सहभागी झाली व त्यांनी परवाना मिळवला.
सुनील मित्तल यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून एअरटेल हा ब्रँड सुरू केला व 1995 मध्ये त्यांनी सेल्युलर सेवा देता यावी याकरिता भारतीय सेल्युलर लिमिटेड या कंपनीची सुरुवात केली. या कंपनीचा ब्रँड असलेल्या एअरटेल ने आज देखील टेलिकॉम क्षेत्रामध्ये चांगले नाव मिळवले असून प्रसिद्ध असे नेटवर्क एअरटेलचे आहे.
एवढेच नव्हे तर जगातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी म्हणून देखील एअरटेलची ओळख आहे. सध्या भारता व्यतिरिक्त आशिया आणि आफ्रिका खंडातील 18 देशांमध्ये एअरटेलचा व्यवसाय सुरू आहे. जर आपण एअरटेलची ग्राहक संख्या बघितली तर ती 399 मिलियन पेक्षा अधिक असल्याचे बोलले जाते व सुनील मित्तल यांची संपत्ती 14.8 बिलियन डॉलर्स इतकी होती व यावेळी फोब्ज मासिकाने यांना भारतातील १९ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित देखील केले होते. एवढेच नाही तर 2007 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.