Investment Plan:- कमावलेल्या पैशांची बचत आणि बचतीची केलेली गुंतवणूक ही भविष्याच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही कितीही पैसा कमावला आणि त्याची बचत व बचतीची गुंतवणूक केली नाही तर मात्र तुम्हाला कायमच आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते व कधीकधी पैशांची आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर मात्र तुम्हाला कर्जाच्या चिखलात बुडण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही.
त्याकरिता गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. गुंतवणूक करणे म्हणजे काही लाखो रुपयांचे गुंतवणूक करणे असे नव्हे तर तुम्ही अगदी पन्नास रुपयांपासून देखील गुंतवणूक करू शकतात व त्यापासून लाखो रुपये मिळवू शकतात. फक्त तुमचा गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी किंवा पर्याय हा उत्तम असणे गरजेचे आहे.
दररोज 50 रुपयांची गुंतवणूक बनवेल तुम्हाला लखपती
सध्या गुंतवणुकीचे जे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी म्युच्युअल फंड मधील एसआयपी ही पद्धत गुंतवणूकदारांमध्ये खूप प्रसिद्ध होताना पाहायला मिळत आहे व या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर साधारणपणे 12 ते 15 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळतो.
परंतु म्युच्युअल फंड एसआयपी मधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अंतर्गत येते. म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला म्हणजेच मासिक आधारावर देखील गुंतवणूक करू शकतात. तुमच्याकडे जर एक रक्कमी पैसे नसतील तर तुम्ही दररोज पन्नास रुपयांची बचत करून यामध्ये गुंतवणूक करू शकतात व मॅच्युरिटी वेळी लाखो रुपयांचा परतावा देखील मिळवू शकतात.
समजा तुमचे वय आता पंचवीस वर्षे आहे व तुम्ही 25 व्या वर्षी म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याकरिता दररोज पन्नास रुपयांची बचत तुमचा मोठा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते. समजा तुम्ही दररोज पन्नास रुपये वाचवले तर त्यामुळे महिन्याला पंधराशे रुपये तुमच्याकडे जमा होतात.
हेच जमा झालेले पंधराशे रुपये जर तुम्ही मासिक आधारावर गुंतवले आणि ही गुंतवणूक पाच वर्षासाठी केली व त्यावर जर कमीत कमी बारा ते पंधरा टक्के व्याजदर तुम्हाला या माध्यमातून मिळू शकतो. पाच वर्षाच्या मॅच्युरिटी नंतर तुम्हाला बारा टक्के व्याजदराच्या हिशोबाने एक लाख तेवीस हजार 329 रुपये मिळतील.
महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे तुमची पाच वर्षात एकूण गुंतवणूक 90 हजार रुपये होते व त्यावर तुम्हाला 33 हजार 329 रुपये व्याज मिळते. हे व्याज आणि मुद्दल मिळून तुम्हाला एक लाख 23 हजार 329 रुपये मिळतात. परंतु यामध्ये लक्षात घ्यावे की हे व्याजदर एखाद्या वेळेस म्युच्युअल फंडाच्या बाजारातील स्थितीनुसार बदलू देखील शकतात.
12% ऐवजी जर तुम्हाला पाच वर्षात 15% व्याजदर मिळाला तर मॅच्युरिटी वेळी तुम्हाला एक लाख तेहतीस हजार आठशे तीस रुपये परतावा मिळतो.
म्हणजेच महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे पाच वर्षात तुमचे एकूण पैसे 90 हजार रुपये जमा होतात व तुम्हाला त्यावर 43 हजार 830 रुपये व्याज मिळते व दोघं मिळून तुमची एकूण रक्कम 133830 रुपये होते. अशा पद्धतीने तुम्ही पन्नास रुपये बचत करून देखील लखपती होऊ शकतात.