Investment Scheme:- गुंतवणूक ही अशी संकल्पना आहे की यामध्ये तुम्हाला घाई करून चालत नाही. तुम्ही जर एखाद्या प्लानमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर ती तुम्ही दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू ठेवणे खूप गरजेचे असते व या मार्गानेच तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे किंवा आर्थिक ध्येय साध्य करू शकतात.
गुंतवणूक ही अनेक पर्यायांमध्ये करता येते व या पर्यायांमध्ये जर आपण एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल बघितले तर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा हा एक दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. जर तुम्ही दीर्घकालीन शिस्तबद्ध पद्धतीने एसआयपी सुरू ठेवली तर तुम्ही लाखो ते करोडो रुपये मिळवू शकतात.

याबाबतीत जर आपण बाजारात योजना बघितल्या तर अशा अनेक योजना आहेत ज्या दीर्घ काळापासून चांगला परतावा देत आहेत. त्यामुळे या लेखात आपण अशा चार योजना बघणार आहोत ज्यांनी पंधरा वर्षांमध्ये एकरकमी किंवा मासिक एसआयपी केल्यावर खूप चांगला परतावा दिलेला आहे. या योजनांनी साधारणपणे पंधरा वर्षाच्या कालावधीत तब्बल 20 ते 22% पर्यंत वार्षिक परतावा दिला आहे. दहा हजार रुपयांची महिन्याला एसआयपी केली असेल तर असे लोक यामुळे करोडपती झाले आहेत.
गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या योजना
1- डीएसपी स्मॉल कॅप फंड– डीएसपी स्मॉल कॅप फंडाने पंधरा वर्षात एसआयपी द्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 22.39% वार्षिक परतावा दिला आहे. जर आपण या योजनेतील एसआयपी कॅल्क्युलेटर बघितले तर महिन्याला जर दहा हजार रुपयांची एसआयपी पंधरा वर्षासाठी केली तर गुंतवणूक 18 लाख 50 हजार रुपये होते व पंधरा वर्षांमध्ये या एसआयपी चे मूल्य एक कोटी 28 लाख 34 हजार 414 रुपये इतके झाले.
दुसरी गुंतवणुकीची पद्धत पाहिली तर यामध्ये एक लाख रुपयांची एक रक्कमी गुंतवणूक पंधरा वर्षासाठी केली तर यावर 22.29 टक्के वार्षिक परतावा मिळून पंधरा वर्षात एक लाख रुपयाचे 20 लाख 45 हजार 805 रुपये मिळू शकतात.
2- एसबीआय कंझम्पशन अपॉर्च्युनिटीज फंड– या फंडाने देखील पंधरा वर्षात एसआयपी गुंतवणूकदारांना 20.07% चा वार्षिक परतावा दिला आहे व त्यासोबतच एकरकमी गुंतवणुकीने पंधरा वर्षात 21.62% वार्षिक परतावा दिला आहे.
या योजनेत जर 15 वर्ष कालावधीसाठी महिन्याला दहा हजार रुपयांची एसआयपी केली तर एकूण गुंतवणूक 18 लाख 50 हजार रुपये होते व पंधरा वर्षांमध्ये या एसआयपीचे मूल्य एक कोटी तीन लाख 92 हजार 787 रुपये होते. तसेच पंधरा वर्षाकरिता एक लाख रुपये एकरकमी गुंतवले तर 21.62% वार्षिक परताव्यासह एक लाखाचे मूल्य 18 लाख 83 हजार 974 रुपये होते.
3- एचडीएफसी मिड कॅप ऑपॉर्च्युनिटीज फंड– या फंडाने देखील गेल्या पंधरा वर्षात एसआयपी गुंतवणूकदारांना 21.68 टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला आहे. तसेच एकारकमी गुंतवणुकीने देखील पंधरा वर्षात 21.46% वार्षिक परतावा दिला आहे.
या फंडमध्ये जर महिन्याला दहा हजार रुपयांची एसआयपी पंधरा वर्षांसाठी केली तर एकूण गुंतवणूक 18 लाख 50 हजार रुपये होते व पंधरा वर्षांमध्ये या एसआयपीचे एकूण मूल्य एक कोटी 20 लाख 37 हजार तीन रुपये होते. तसेच एकरकमी एक लाख रुपये पंधरा वर्षे कालावधी करिता गुंतवले तर 21.46% वार्षिक परताव्यासह या गुंतवणुकीचे मूल्य 18 लाख 47 हजार 137 रुपये होते.
4- आयसीआयसीआय प्रूडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड– या फंडने देखील गेल्या पंधरा वर्षात एसआयपी गुंतवणूकदारांना 21.43% वार्षिक परतावा दिला आहे व एकरकमी गुंतवणुकीने पंधरा वर्षात 21.24 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
या फंडामध्ये जर मासिक दहा हजार रुपयांची एसआयपी पंधरा वर्षाच्या कालावधीत केली तर एकूण गुंतवणूक 18 लाख 50 हजार रुपये होते व पंधरा वर्षांमध्ये या एसआयपीचे एकूण मूल्य एक कोटी 17 लाख 63 हजार पाचशे आठ रुपये होते.
तसेच या फंडमध्ये 15 वर्षाकरिता एक लाख रुपये एकरकमी गुंतवले तर 21.46% वार्षिक परताव्यासह एक लाख गुंतवणुकीचे मूल्य 17 लाख 97 हजार 583 रुपये झाले.