पिकविमा कंपनी ठग तर कंपनीचे प्रतिनिधी महाठग! शेतकऱ्यांकडून केली जातेय पैशांची वसुली ; काय आहे नेमकं प्रकरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jalgaon News : पिक विमा कंपनीचा अनागोंदी कारभार आपण अनेकदा पाहिला आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई देत असून कंपन्याकडून सर्रास शेतकऱ्यांची ठगी केली जात आहे. आतापर्यंत आपण विमा कंपन्यांचा अनागोंदी कारभार पाहिला मात्र आता जळगाव जिल्ह्यातून पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा देखील ठगी करण्याचा अनोखा अंदाज समोर आला आहे.

एकीकडे पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना लुटून आपल्या तिजोऱ्या फुल करण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे कंपनीच्या प्रतिनिधीकडून भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना एका वेगळ्याच पद्धतीने ठगलं जात आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांकडून जिओ टॅगिंग व निकषात बसवून देण्याच्या नावाने विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून दोन ते तीन हजार रुपये हेक्टरी पैसे ओरबाडले जात आहेत.

म्हणजेच या प्रतिनिधीनी एक प्रकारे शेतकऱ्यांना लुटण्याचा हा अनोखा गोरखधंदा सुरु केला आहे. विशेष म्हणजे आता प्रतिनिधी एवढे महाठग बनले आहेत की ते आता ज्या शेतकऱ्यांनी केळीची लागवड केलेली नाही अशा शेतकऱ्यांना देखील निकषात बसून देण्याचा दावा करत असून यासाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची वसुली करत आहेत.

लोकमतने दावा केला आहे की अनेक महसूल मंडळात हा प्रकार सरास सुरू आहे. जी की एक धक्कादायक बाब आहे. प्रतिनिधी आता एवढे माजोरी बनले आहेत की त्यांनी वसुलीची रक्कम देखील वाढवली आहे. गरीब भोळे-भाबडे शेतकरी बांधव आपण निकषात बसल्यावर प्रतिनिधींकडून अडचण निर्माण केली जाऊ शकते या धाकापोटी त्यांच्याकडून मागितलेली रक्कम शेतकरी नाईलाजास्तव देत आहेत.

मात्र आता रक्कम दिवसेंदिवस वाढत असल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. खरं पाहता पिक विमा साठी पात्र ठरलेल्या महसूल मंडळाची यादी विमा कंपन्यांच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे मिळते. त्यानंतर पात्र ठरलेल्या महसूल मंडळामध्ये जाऊन सदर अधिकारी शेतकऱ्यांना हमखास निकषात बसवून देऊ अशी बतावणी करत शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल केली जात आहे.

म्हणजे कंपनी प्रतिनिधींकडून एकदम सुयोग्य पद्धतीने शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाला अंधारात ठेऊन हा सगळा कार्यक्रम चालू असून याकडे कृषी विभागाने लक्ष घालणे गरजेचे आहे. निश्चितच आतापर्यंत पिक विमा कंपन्यांच्या ठगीचे किस्से अनेक पाहिलेत मात्र कंपन्यांचे प्रतिनिधी देखील कंपनीपेक्षा कमी नसल्याचे या घटनेवरून समजत आहे.