नीट’ परीक्षा घोटाळ्यातील बाधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ! आमदार सत्यजीत तांबे यांची आग्रही मागणी

Ahmednagarlive24
Published:
Satyajit Tambe

अहमदनगर – नीट परीक्षेत झालेला गैरप्रकार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारा आहे. तसेच देशाच्या विश्वासार्हतेला तडा देणार आहे. केंद्र सरकारने तातडीने जागे व्हावे, या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच घोटाळ्याने बाधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी आमदार सत्यजीत तांबे यांनी शासनाकडे मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पालक नीट परीक्षेबाबत तक्रार करत आहेत. तसेच पालकांकडे या परीक्षेच्या गोंधळाचे पुरावे देखील आहेत. सामान्य परिवारातील लाखो मुलांनी मेडिकलमध्ये करिअर करायचे स्वप्न पाहिलेले असते.

ते या देशाचे भविष्यातले डॉक्टर बनणार आहेत. परंतु अशा परीक्षांच्या घोटाळ्यामुळे मुलांचे स्वप्न भंग होते. तर नीट परीक्षेतील बाधित विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आ. तांबेनी केंद्र सरकारकडे केली आहे.

परीक्षेत ग्रेस मार्कांचा घोटाळा, सेंटर विकत घेणे, पेपर फुटी आणि एकाच सीरियल नंबरचे सात पेक्षा जास्त मुले टॉपर झाले आहेत. आतापर्यंत नीट परीक्षेमध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. याआधी नीट परीक्षेत तीन पेक्षा जास्त अव्वल मुले आलेली नाहीत.

म्हणजेच हा एक प्रकारचा मोठा घोटाळा झाला आहे. त्यामुळे नीटच्या परीक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच केंद्र सरकारने ठोस निर्णय देखील घेणे गरजेचे आहे. जेणेकरून, नीट परीक्षेला बसलेल्या लाखो मुलांना न्याय मिळेल, असेही आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe