Loksabha Election 2024 : निकालानंतर निलेश लंके काय बोलले ? प्रचारात काही जण भाजपाच्या व्यासपीठावर असूनही…

Ahmednagarlive24
Published:
Nilesh Lanke

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या नगर दक्षिणमध्ये नीलेश लंके विजयी झाले असून, त्यांनी विद्यमान खासदार सुजय विखे यांना २९ हजार ३१७ मतांचे मताधिक्य घेऊन धूळ चारली.

नगर दक्षिणमध्ये महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोर महाविकास आघाडीने नवा चेहरा असलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना उभे केले.

लंकेंनी मतदारसंघात गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालवली होती. त्यामुळे विखेंसमोर त्यांनी सुरुवातीपासून मोठे आव्हान निर्माण केले होते. या मतदारसंघाबाबत राज्यात उत्सुकता होती. अखेर नीलेश लंके जायंट किलर ठरले. त्यामुळे महायुतीबरोबरच विखेंनाही जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान निवडून आल्यानंतर अहमदनगर दक्षिण लोकसभेतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी आगामी काळात काम करणार आहे. हा खऱ्या अर्थाने माझ्या शेतकऱ्यांचा विजय आहे.

कुणाला काय आरोप करायचे ते करू द्या. त्यावर मी बोलणार नाही. फक्त आणि फक्त मायबाप जनतेची कामे करणार आहे, अशी प्रतिक्रिया निकालानंतर महाआघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी माध्यमांना दिली.

ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे. माझ्या विजयात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहेच; पण काही अदृश्यशक्तीने मला मदत केली.

प्रचारात काही जण भाजपाच्या व्यासपीठावर असूनही आपल्याला मदत केली. मला मदत करणाऱ्या भाजपमधील अदृश्य शक्तीला धन्यवाद देतो. त्यांना त्यांच्या निवडणूक काळात मदत करण्याची भूमिका घेणार आहे. प्रचारात आरोप केले गेले. त्यावर आपण आताच बोलणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe