Solar Krushi Pump Scheme:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतीच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या अशा योजना राबवल्या जात असून या माध्यमातून शेतीमधून मिळणारे उत्पादन वाढावे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा केंद्र सरकारचा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असल्याकारणाने शेतीचा विकास म्हणजेच देशाचा विकास हे एक सूत्र असल्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासावर जास्तीत जास्त भर देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत
जर आपण शेती पुढील समस्या पाहिल्या तर यामध्ये शेतीला जो काही विजपुरवठा होतो तो बहुतांशी रात्रीच्या वेळेस होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा याकरिता केंद्र सरकारच्या मधून पीएम कुसुम योजनेसारखी योजना राबवली जाते.
तसेच महाराष्ट्र शासनाची जर आपण योजना बघितली तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना देखील खूप महत्त्वाची असून ही योजना आता सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना शेती सिंचनासाठी सौर कृषी पंप दिले जातात. याकरिता शेतकऱ्यांकडून आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत व या महत्त्वाच्या योजनेची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची काय आहेत महत्त्वाची वैशिष्ट्ये?
1- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी असलेली स्वतंत्र तसेच हक्काची व शाश्वत अशी योजना आहे.
2- सर्वसाधारण गटातील जे शेतकरी असतील त्यांना दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा संपूर्ण सेट या योजनेच्या माध्यमातून मिळतो.
3- शेतकरी जर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतील तर शेतकऱ्यांना त्यांच्या वाटचा हिस्सा पाच टक्के भरावा लागतो.
4- यामध्ये जी काही बाकीची रक्कम असते ती केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते व हे अनुदान जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एचपीचा पंपानुसार दिली जाते.
5- या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सौर कृषी पंपावर पाच वर्षाची दुरुस्तीची गॅरंटी असणार आहे.
काय आहेत लाभार्थी निवडण्यासाठीच्या अटी किंवा निकष?
1- ज्या शेतकऱ्याकडे अडीच एकरपर्यंत शेतजमीन असेल अशा शेतकऱ्याला या योजनेच्या माध्यमातून तीन अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जातो.
2- ज्या शेतकरी बंधूंकडे अडीच एकर ते पाच एकर पर्यंत शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जातो.
3- पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्ति क्षमतेचा सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून मिळतो.
4- यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे या योजनेच्या माध्यमातून जी काही पात्र क्षमता आहे त्यापेक्षा जर कमी क्षमता असेल तर सौर कृषी पंपाची मागणी केल्यास या माध्यमातून सौर कृषी पंप मिळत नाही.
5- तसेच विहीर किंवा बोरवेल यांचे मालक, वैयक्तिक तसेच सामुदायिक शेततळे असलेले शेतकरी, तसेच ज्या शेतीच्या शेजारून नदी किंवा नाला वाहतो असे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
6-ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर इत्यादी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे या प्रकारची खात्री देखील महावितरणच्या माध्यमातून करण्यात येईल.
7- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर जलसंधारणाचे काम झाले असेल व त्या ठिकाणी पाणी जिरवण्याचा पाणीसाठा असेल तर त्या ठिकाणाहून पाण्याचा उपसा करण्यासाठी हा सौर कृषी पंप वापरता येणार नाही.
8- यामध्ये अटल सौर कृषी पंप योजना एक, अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या तिन्ही योजनांचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नसेल असे शेतकरी देखील या योजनेमध्ये लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
अर्जासाठी कुठली कागदपत्रे लागतील?
1- यामध्ये शेतकऱ्याचा शेतीचा सातबारा उतारा( उताऱ्यावर संबंधित शेतीसाठी असलेल्या जलस्त्रोतांची नोंद आवश्यक)
2- भाडेपट्ट्याने शेती असेल तर संबंधित शेती मालकाचा ना हरकत दाखला रुपये दोनशेच्या स्टॅम्पवर घेणे बंधनकारक
3- अर्जदाराचे आधार कार्ड
4- अर्जदाराचे बँक पासबुक
5- पासपोर्ट आकाराचा फोटो
6- अर्जदाराच्या जातीचा दाखला/ प्रमाणपत्र
7- पाण्याचा स्त्रोत जर डार्क झोनमध्ये असेल तर तसे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
या योजनेच्या संदर्भात अर्ज भरताना काही अडचण आल्यास किंवा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही तालुकास्तरावरील महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधू शकतात किंवा कृषी विभाग देखील तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो.