मराठमोळ्या शेतकऱ्यांचा नादखुळा ! आफ्रिकन देश टांझानियामध्ये भाडेतत्त्वावर जमीन घेऊन सुरू केली कांद्याची शेती ; अख्ख्या भारतात रंगली चर्चा

Maharashtra Viral Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी देशात आपले नाव कोरत आहेत. दरम्यान नासिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने असं काही केलं आहे की सध्या अख्ख्या भारतात त्याचं नाव गाजत आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या मौजे शेळकेवाडी येथील एका तरुणाने चक्क आफ्रिकन देश टांझानियामध्ये भाडेतत्त्वावर जमीन घेऊन कांद्याची शेती सुरू केली आहे. यामुळे सध्या या नादखुळा कार्यक्रमाची आणि नवयुवक तरुणाची सर्वत्र चर्चा आहे. शेळकेवाडी गावातील प्रवीण बाळासाहेब जगताप या नवयुवकाने अहमदाबाद येथील व्यापारी नरेंद्र गुप्ता यांच्या समवेत टांझानियामध्ये 40 एकर शेती भाड्याने घेऊन कांदा लागवड केली आहे. 

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कशी सुचली ही कल्पना

खरं पाहता प्रवीण जगताप यांची पार्श्वभूमी ही शेतीचीच आहे. त्यांना शेतीची विशेष आवड देखील आहे. मात्र वडिलोपार्जित शेत जमीन खूपच कमी आहे. त्यामुळे आवड असली तरी देखील कमी शेत जमिनीत अपेक्षित असे शेतीचे प्रयोग त्यांना राबवता येत नाहीत. शिवाय अपेक्षित असं उत्पन्न हे त्यांना कमी क्षेत्रामुळे मिळत नाही. दरम्यान, प्रवीण यांची लासलगाव एपीएमसी मध्ये कांदा खरेदीसाठी येणाऱ्या अहमदाबादच्या नरेंद्र गुप्ता यांच्याशी ओळख झाली.

खरं पाहता गुप्ता यांच्यासोबत प्रवीण यांचे दाजी वाल्मीक वाघ यांनी परिचय करवून दिला. गुप्ता आणि प्रवीण यांची चांगली गट्टी जुळली. मग गुप्ता यांनी प्रवीणला टांझानियामध्ये कांदा लागवड करण्याचा प्लॅन सांगितला. प्रवीणने प्लॅन ऐकला आणि होकार दिला. मग त्या ठिकाणी 40 एकर शेत जमीन घेण्यात आली. तिथे गेल्या एक महिन्यांपासून प्रवीणच्या मार्गदर्शनाखाली आता कांद्याची शेती केली जात आहे.

सुरुवातीला त्या ठिकाणी स्वाहेली भाषा जी की टांझानियामध्ये बोलली जाते ती समजण्यास प्रवीणला अडचण येत होती. त्यासाठी गाईडची मदत घेण्यात आली. आता प्रवीणला ती भाषा देखील बऱ्यापैकी समजत असून आता भाषेसाठी गाईडची आवश्यकता त्याला भासत नाही. प्रवीण यांना दर महिन्याला प्रवासासाठी आरोग्यविषयक, खर्चासाठी निवासासाठी श्री गुप्ता यांच्याकडून चाळीस हजार रुपये देण्याचे मान्य झाले आहे.

खरं पाहता टांझानियामध्ये कांद्याची मागणी मोठी आहे मात्र त्या ठिकाणी कांद्याचे उत्पादन कमी होते. तिथे मका या पिकाचे सर्वाधिक उत्पादन होत असते. अशा परिस्थितीत कांदा या पिकाची त्या ठिकाणी लागवड करून अधिक उत्पन्न मिळू शकत या अनुषंगाने प्रवीण आणि श्री गुप्ता यांनी त्या ठिकाणी कांद्याची लागवड केली आहे.

निश्चितच मराठमोळ्या शेतकऱ्याने केलेली ही कामगिरी गौरवास्पद असून पंचक्रोशीत त्याची सध्या चांगली चर्चा रंगली आहे. प्रवीण यांनी केलेले हे काम इतरांसाठी मार्गदर्शक असून परविन यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.