मान्सूनचे आगमन लवकरच होत असून, यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाडी, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठा खंड राहण्याची शक्यता आहे.
दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
तसेच पुणे, यवतमाळ येथे १०० टक्के, चंद्रपूर, निफाड १०३ टक्के, तर दापोली येथे १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.महाराष्ट्रासाठी सन २०२४ सालासाठी जून ते सप्टेंबरदरम्यानच्या मान्सूनची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
जून ते सप्टेंबरदरम्यान पश्चिम विदर्भ विभागात ९८ टक्के पाऊस (अकोला ९८ टक्के), मध्य विदर्भात ९८ टक्के (नागपूर ९७, यवतमाळ १०० टक्के), पूर्व विदर्भ विभागात १०३ टक्के (शिंदेवाडी, चंद्रपूर १०३ टक्के), मराठवाडा विभाग ९७ टक्के (परभणी ९७ टक्के), कोकण विभाग १०६ टक्के पाऊस (दापोली १०६ टक्के),
उत्तर महाराष्ट्र ९८ टक्के (निफाड १०३, धुळे ९५, जळगाव ९५ टक्के), तर पश्चिम महाराष्ट्रात ९७ टक्के पाऊस (कोल्हापूर ९५, कराड ९७, पाडेगाव ९५, सोलापूर ९५, राहुरी ९९, तर पुणे १०० टक्के) पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.