Mumbai Ahmedabad Bullet Train Project : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भारतात वंदे भारत एक्सप्रेस सारख्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या हाय स्पीड ट्रेन सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे लवकरच देशात बुलेट ट्रेन देखील धावणार आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन राजधानी मुंबई आणि गुजरात मधील अहमदाबाद दरम्यान धावणार आहे.
सध्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास गतिमान होणार आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत मुक्तीचे महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरेतर या प्रकल्पांतर्गत शंभर किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच यापुढील अडीचशे किलोमीटरच्या अंतरापर्यंत खांब उभारण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे.
एवढेच नाही तर काम सुरू झाल्यापासून सहा महिन्यांच्या काळातच नवी मुंबईतील 394 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला यश आले आहे. म्हणजेच या प्रकल्पाचे काम जलद गतीने होत आहे. घणसोली येथे अतिरिक्त मध्यवर्ती बोगदा (ADIT) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यान 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार असा विश्वास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.
या बोगद्याचे काम डिसेंबर 2023 मध्ये सुरू झाले होते. या प्रकल्पात एकूण 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाणार आहे. पण, या बोगद्याचा सुमारे सात किलोमीटर भाग ठाणे खाडीतील समुद्राखालून जाणार आहे. सध्या बीकेसी, विक्रोळी आणि घणसोलीजवळ सावली येथे 3 शाफ्टचे बांधकाम युद्धपातळीवर सुरु आहे.
हे शाफ्ट टनेल बोरिंग मशीन्स (TBM) वापरुन 16 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात मदत करणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन चा कॉरिडॉर तयार होणार आहे. खरे तर या दोन्ही शहरा दरम्यान सध्या स्थितीला धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनने प्रवास केला तर सात ते आठ तासांचा कालावधी खर्च करावा लागतो.
मात्र जेव्हा ही बुलेट ट्रेन सुरु होईल तेव्हा हा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होऊ शकतो असा दावा केला जात आहे. म्हणजेच मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास या प्रकल्पामुळे खूपच जलद होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. या मार्गावर बारा स्थानके तयार होणार आहेत.