चलो नागपूर! जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर राज्य कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा

Old Pension Scheme News : 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना बहाल करण्यात आली आहे. नवीन पेन्शन योजनेत अनेक दोष असल्याने राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार ही योजना रद्दबातल करून ओपीएस योजना लागू करण्याबाबत शासनाला निवेदन दिली जात आहेत.

यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या पाच वर्षांपासून राज्यस्तरावर आंदोलन उभारत आहे. आता संघटनेने वाशिम जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. खरं पाहता संघटनेने राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या ठिकाणी ओ पी एस योजना लागू करण्यासाठी आंदोलने केली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

संघटनेने राज्यव्यापी आंदोलन करून देखील शासनाने कर्मचाऱ्यांच्या या मागणीकडे लक्ष घातले नसल्याने आता संघटनेच्या वतीने नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला जाणार आहे. या रणनीतीचाच एक भाग म्हणून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्याचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात संघटनेचे सदस्य अभियान सुरू करण्यात आले असून वाशिम जिल्ह्यात याला विशेष प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात पाचशे जणांची ऑनलाईन तसेच ऑफलाइन नोंदणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पंधराशे एनपीएस कर्मचाऱ्यांचे नोंदणी करण्याचे टार्गेट संघटनेच्या वतीने ठेवण्यात आले आहे. संघटनेची तालुका निहाय सभासद नोंदणी सुरु आहे. निश्चितच जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटना आक्रमक भूमिकेत अवतरले आहेत.

यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य शासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खरं पाहता राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजने व्यतिरिक्त सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय करणे यासाठी देखील वारंवार मागणी करत आहेत.

यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीकडे शासनाकडून या हिवाळी अधिवेशनात हात घातला जातो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.