Pm Kusum Yojana : शेतकऱ्यांनो सावधान ! पीएम कुसुमच्या नावावर शेतकऱ्याला गंडवलं ; तब्बल पावणेचार लाखांचा लागला चुना, ‘ही’ दक्षता घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kusum Yojana : शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. मात्र अलीकडे शासकीय योजनेच्या नावावर सामान्य जनतेची, भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासकीय योजनेबाबत परिपूर्ण माहिती घेऊनच अधिकृत संकेतस्थळावर संबंधित योजनेसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे चान्सेस अधिक आहेत. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे देखील पीएम कुसुम योजनेच्या नावावर लाखों रुपयांची फसवणूक झाली आहे.

तालुक्यातील सोनखास येथील संजय खोचे नामक शेतकऱ्यासोबत ही घटना घडली आहे. संजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या मोबाईलवर बाजार भाव पाहत होते. बाजार भाव पाहत असतानाच त्या ठिकाणी पीएम कुसुम योजनेचीं जाहिरात आली. त्या जाहिरातीत एका वेबसाईटची लिंक होती. संबंधित वेबसाईट ही पीएम पुसून योजनेप्रमाणेच भासत असल्याने संजय यांनी त्या वेबसाईटवर जाऊन आपल्या पत्नीच्या नावाने या योजनेसाठी अर्ज केला.

यामध्ये त्यांनी खाते क्रमांक देत नोंदणी शुल्क व 382,274 रुपयांचा भरणा देखील केला. त्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनी सोबत त्यांचा संपर्क झाला नाही. मग त्यांनी आपल्या परिचयातील एका व्यक्तीकडून संबंधित वेबसाईटची चौकशी केली. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.

यानंतर मग त्यांनी मंगळूरपीर पोलीस स्थानकात संबंधित घटनेबाबत गुन्हा दाखल केला. संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवर आता या बोगस कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेने शेतकऱ्यांना मात्र सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. शेतकरी बांधवांनी कोणत्याही योजनेची संपूर्ण शहानिशा करण्याखेरीज अशा पद्धतीने ऑनलाईन पैशांचा भरणा करणे टाळावे. अनेकदा योजनेचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून फसवणूक ही केली जाते.

यामुळे, योजनेची पूर्ण शहानिशा करून तसेच शासकीय योजनेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन अर्ज करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे. कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेची माहिती घेण्यासाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी भेट द्यावी आणि अधिकाऱ्यांकडून योजनेसंदर्भात माहिती घेऊनचं अर्ज करावा असं जाणकारांकडून सांगितलं जात आहे.