Poisonous Snake: हिवाळ्यामध्ये ‘या’ अतिविषारी सापापासून घ्या काळजी! या कालावधीत आढळतो मानवी वस्तीत, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
ghonas snake

Poisonous Snake:- भारतामध्ये अनेक प्रकारच्या सापांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. प्रत्येक प्रजातीचे शारीरिक रचनेपासून तर इतर गुणधर्मांमध्ये अनेक वैविध्यपूर्ण अशी वैशिष्ट्ये आहेत. या प्रजातींमध्ये बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी वर्गात मोडतात तर काही बोटावर मोजण्या इतक्या सापांच्या प्रजाती या विषारी आहेत.

त्यातल्या त्यात काही प्रजाती या अतीविषारी असून यामध्ये प्रामुख्याने नाग, घोणस तसेच फुरसे आणि मन्यार या सापाच्या जाती अति विषारी प्रकारात मोडले जातात. यातील जर आपण घोणस या प्रजातीच्या सापाचा विचार केला तर हा अतिविषारी वर्गामध्ये गणला जाणारा साप असून हिवाळ्याचा कालावधी हा या जातीच्या सापाचा मिलनाचा कालावधी असल्यामुळे या दिवसांमध्ये या सापापासून बऱ्याचदा धोका निर्माण होतो. याच सापा विषयीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 हिवाळ्यामध्ये घोणस जातीच्या सापापासून असतो धोका

सापांच्या जातींमध्ये घोणस या जातीचा साप अति विषारी असून या प्रजातीच्या सापाचा हिवाळा हा कालावधी मिलनाचा कालावधी असतो. त्यामुळे अंड्यांचे प्रजनन आणि शरीराला उष्णता मिळावी याकरिता दिवसा उन्हामध्ये आणि रात्रीच्या वेळी मानवी वस्तीत घर आणि परिसरामध्ये घोणस जातीचा साप प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हा कालावधी या जातीच्या सापाचा मिलनाचा कालावधी असल्यामुळे या जातीचा नर आणि मादी अडचणीच्या ठिकाणांमधून बाहेर पडतात व कडाक्याच्या थंडीत ते स्वतःच्या शरीराचे तापमान वाढवण्याकरिता दिवसा उन्हामध्ये येतात. तसेच रात्रीची वेळ असेल तर बाथरूमचा पाईप तसेच पाईपद्वारे घरात किंवा दाराची फट असेल तर त्यातून आत शिरून घरातील उबदार ठिकाणी जाऊन बसतात.

हा साप लांबीला तो तीन ते पाच फूट पर्यंत असतो. घोणस जातीच्या सापाचे डोके मोठे असते व चपटे तसेच त्रिकोणी व मानेपासून वेगळे दिसते. यासोबतच या सापाच्या डोक्यावर व पाठीवर लहान लहान आकाराचे खवले असतात व या जातीच्या सापाची शेपटी ही लहान असते.

या जातीच्या सापाचा पाठीकडचा रंग फिक्कट ते गडद तपकिरी असतो व प्रत्येक ठिपक्याच्या कडेला पांढरी किनार असते. पोटाचा खालचा भाग फिकट पांढरा व त्यावर रुंद आकाराचे आडवे पट्टे असतात. जेव्हा हा साप फुतकारतो तेव्हा मोटारीच्या चाकातील हवा सोडताना जसा आवाज येतो तसा आवाज निघतो.

 घोणस जातीच्या सापापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी?

या जातीच्या सापापासून बचाव करण्याकरिता जर तुम्ही एखाद्या अडचणीच्या ठिकाणी काम करत असाल तर पायाच्या घोट्याच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचे बूट परिधान करावेत. अडचणीच्या ठिकाणी किंवा ज्या जागेवर आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येणार नाही अशा ठिकाणी थेट हात टाकू नये.

त्या अगोदर जर त्या ठिकाणी काठी फिरवली तर हालचाल लक्षात आल्यामुळे तिथे असणारे काही सरपटणारे प्राणी निघून जातील.बाथरूमचा पाईप जर बाहेर असेल तर त्याला जाळी बसवून घ्यावी. रात्रीच्या वेळी दरवाजे किंवा खिडक्या बंद करताना मध्ये फट राहणार नाही याची काळजी घ्यावी.

घराचे छत तसेच भिंतीला फटी असतील तर त्या व्यवस्थित बुजवून घ्याव्यात. तसेच घरामध्ये जर एखादी मांजर पाळली असेल तर तिचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण मांजराची नजर अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे घरात जर साप वगैरे शिरला तर मांजरला ते लवकर कळू शकते. तसेच तुम्ही राहत असलेल्या परिसरामध्ये किंवा एखाद्या मोकळ्या जागेत जर तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी मुंगूस असेल तर खूप मोठा फायदा होतो.कारण मुंगूस हा सापाचा नैसर्गिक शत्रू मानला जातो.

 घोणस जातीचा साप हल्ला केव्हा करतो?

घोणस जातीच्या सापाच्या मादीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मादी पिल्लांना जन्म देते. परंतु अंडी घालत नाही. अंडी मादीच्या पोटामध्येच मोठी होतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या जातीचा साप स्वतःहून कधीच व्यक्तीवर हल्ला करू शकत नाही. जर एखादी असुरक्षित क्रिया किंवा हालचाल त्याला लक्षात आली तरच तो प्रतिहल्ला करतो.

जर घोणस जातीच्या सापाने दंश केला तर शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात व रक्त कोशिका फुटण्याचा धोका संभवतो. तसेच किडनी देखील निकामी होऊ शकते. त्यामुळे जर या जातीच्या सापाने चावा घेतला तर सरकारी दवाखान्यात जाऊन याचे प्रतिविष लवकरात लवकर टोचून घेणे फायद्याचे आहे. त्यामुळे सर्पदंश झालेला रुग्ण बरा होण्यास मदत होते व मृत्यूचा धोका देखील टळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe