नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! शेतकऱ्याची मुलगी बनली कवयित्री आणि लेखिका,वाचा या शेतकरी कन्येची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ग्रामीण भाग म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येते की शेती आणि शेती करणारे शेतकरी कुटुंबे. अगोदरपासून ग्रामीण भागाबद्दल विचार केला तर या प्रत्येक सुशिक्षित शहरी माणसाच्या मनामध्ये एक गोष्ट कायम कोरली गेलेली असते ती म्हणजे ती ग्रामीण भागातील व्यक्ती हे अशिक्षित असतात आणि शेती शिवाय त्यांना जीवनाच्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांबद्दल काहीही माहिती नसते. परंतु वर्षानुवर्षाचा हा गैरसमज  आता ग्रामीण भागातील आणि प्रामुख्याने शेतकरी कुटुंबातील मुला मुलींनी खोडून काढलेला आहे.

याचे उत्तमच उदाहरण घ्यायचे झाले म्हणजे गेल्या काही वर्षापासून एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी शहरी भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर धोबीपछाड केले आहे. म्हणजेच प्रत्येक क्षेत्रामध्ये आता ग्रामीण भागातील मुलं उंच भरारी घेताना दिसून येत आहेत आणि शहरी भागांच्या मुलांच्या तुलनेमध्ये नक्कीच सरस ठरत आहेत. स्पर्धा परीक्षा किंवा इतर गोष्टी ठीक आहेत परंतु लेखन क्षेत्रामध्ये एखाद्या ग्रामीण भागातील आणि खास करून शेतकरी कुटुंबातील मुलीने जर दैदीप्यमान यश मिळवले तर नक्कीच आश्चर्य वाटेल.

ज्या व्यक्तींकडे अगाध प्रतिभाशक्ती असते असेच व्यक्ती हे लेखन किंवा काव्य  क्षेत्रामध्ये नाव कमवू शकतात किंवा प्रगती करू शकतात. कारण हे कोणालाही जमणारी गोष्ट नाही. परंतु आता या क्षेत्रामध्ये देखील ग्रामीण भागातील मुली मागे नाहीत असेच आता दिसून येत आहे व याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या सत्यगाव या गावच्या पूजा सांगळे या शेतकरी कन्येने अलौकिक अशी कामगिरी करून दाखवली आहे.

 पूजा सांगळे यांची यशोगाथा

पूजा सांगळे या मुळच्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या सत्यगाव इथल्या रहिवाशी असून संपूर्ण कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे. त्यामुळे शेतीत आई वडिलांना मदत करत पूजा यांनी त्यांचे सगळे शिक्षण पूर्ण केले. जेव्हा त्या पाचवीमध्ये होत्या तेव्हा त्यांना शाळेमध्ये शिक्षकांनी घरून प्रत्येक मुलांना कविता लिहून आणायला सांगितले होते व त्यांची कविता चांगली असेल त्यांना शिक्षक बक्षीस म्हणून पेन देणार होते. याच बक्षीसाकरिता पूजा सांगळे यांनी त्यांची पहिली कविता ‘नदी माय’ लिहिली आणि पहिले बक्षीस देखील मिळवले. याच प्रसंगापासून त्यांची लेखनाला सुरुवात झाली.

त्यानंतर मात्र त्यांनी शेतात काम करत असताना आजूबाजूचे वातावरण व स्थिती पाहून देखील कविता त्या लिहू लागल्या. मनातील कल्पनाशक्ती कागदावर शब्द रूपाने प्रकटू लागली. असेच पुढे जात त्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी उत्तम यश मिळवले. शेतीत आई-वडिलांना मदत आणि लेखन करत असताना ते शिक्षण देखील पूर्ण करत होते. आपल्याला माहित आहेच की ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा दुसऱ्या गावी शाळेसाठी काही किलोमीटरचे अंतर पायपीट करत जावे लागते व अगदी याच पद्धतीने पूजा यांना देखील तीन किलोमीटरचे अंतर कापत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे लागले.

त्यानंतर अकरावी ते बीएससी म्हणजेच पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी  घेतले व पुढे एमबीए करत असताना त्यांच्या मनात आले की आपण देखील एखादे पुस्तक छापावे. परंतु जेव्हा हा विचार मनात आला तेव्हा त्यांना वाटायला लागले की आपण सामान्य शेतकरी कुटुंबातील असून आपल्याकडून हे शक्य होईल काय? परंतु या विचाराला बाजूला सारत मोठ्या कष्टाने त्यांनी 14 जानेवारी 2023 रोजी त्यांचे हे ध्येय साध्य करून दाखवले. यावेळी त्यांनी आयुष्य अहवाल आणि संघर्ष हे पुस्तक प्रकाशित केले. हा प्रवास एवढा सोपा नव्हता.

अनेक अडथळ्यांचा सामना करत त्यांनी हे यश मिळवले व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये पुस्तक लिहिण्याचे धाडस केले व ते यशस्वी देखील करून दाखवले. त्यानंतर अनेक मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पूजा सांगळे यांचे लिखाण अनेक पुस्तकांमध्ये घेण्यात आलेले आहे. पूजा यांनी लिहिलेल्या दोन कविता प्रसिद्ध अशा पुस्तकांमध्ये निवडण्यात आले असून यातील एक पुस्तक म्हणजे मनातील भावना आणि दुसरे म्हणजे विजयपथ हे होय.

या पुस्तकांमध्ये त्यांच्या माहेरची शिदोरी आणि ए मेरी जिंदगी, वास्तवातील बालपण यासारख्या कवितांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. म्हणजेच सुशिक्षित म्हणून मिरवणाऱ्या शहरी भागातील मुला मुलींना जे जमणार नाही ते एका शेतकरी कुटुंबातील मुलीने करून दाखवले आहे. एका ग्रामीण भागात राहून आणि शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे होऊन देखील पूजा सांगळे यांची ही कामगिरी खूप कौतुकास्पद अशी आहे.