Pune News : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत असतात. जिल्ह्यातील शेतकरी काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल करत आपलं वेगळंपण जोपासत आहेत. विशेषता इंदापूर तालुक्यात प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून सर्वांच्याच लक्ष वेधून घेतले आहे. तालुक्यातील उजनी धरणाच्या कुशीत वसलेला भाग प्रामुख्याने उसाच्या लागवडीसाठी विख्यात आहे.
उजनी धरणाच्या जलाशयाचा लाभ घेत येथील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीतून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. मात्र ऊस लागवडीत गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी आता येथील शेतकऱ्यांनी पिकप पद्धतीत बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. ऊसाला पर्याय म्हणून या भागात आता विविध फळ पिकांची लागवड जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी केलेला हा बदल त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे.
तालुक्यातील मौजे तरटगाव येथील एका युवा शेतकऱ्याने देखील ऊस पिकाला पर्याय शोधत पपईची लागवड केली आहे. पपईच्या शेतीसाठी इतर फळ पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आहे यामुळे या पिकाची या भागात अनेक शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. वास्तविक पपईचे पीक हे उष्ण हवामानात अधिक उत्पादन देत असते. गेल्या काही वर्षांपासून इंदापूर तालुक्यात देखील थोडसं उष्ण हवामान तयार होत आहे. वातावरणातील हा बदल लक्षात घेता तरटगावचे कृषी पदवीधर युवा शेतकरी राजेंद्र ननवरे यांनी पपई लागवड केली आहे.
यातून राजेंद्र यांना चांगली कमाई देखील होत आहे. राज्यातील बहुतांशी भागात पपईची लागवड जून ते ऑक्टोबर दरम्यान केली जाते. पपई शेती प्रामुख्याने खानदेश मध्ये त्यातल्या त्यात नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असते. राजेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि मध्यम तांबडा मुरमाड जमिनीत पपई लागवडीचा निर्णय घेतला. लागवड करण्यापूर्वी जमिनीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने पूर्व मशागत करण्यात आली. यानंतर पीक वाढीसाठी शेणखत देखील जमिनीत मिसळण्यात आले.
मग एक जून 2022 रोजी गादीवाफा पद्धतीने आपल्या 50 गुंठे शेतजमिनीत पपईची लागवड केली. हिवाळ्यात आठ ते नऊ दिवसांनी आणि उन्हाळ्यात दर पाच दिवसांनी त्यांनी पपई बागेला पाणी दिले. बागेची योग्यरीत्या काळजी घेतल्यानंतर आणि पपई पिकावर आलेल्या रोगांसाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाने योग्य ती फवारणी केली असल्याने त्यांना डिसेंबर 2022 पासून पपईचे उत्पादन मिळत आहे. आतापर्यंत 18 टन एवढ उत्पादन त्यांना मिळालं असून पपई पिकातून दोन वर्षे उत्पादन मिळत असल्याने एकूण 50 ते 60 टन उत्पादन त्यांना होणार आहे.
राजेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई कोलकत्ता सुरत यांसारख्या बाजारपेठात त्यांचा माल विक्री होत आहे. पपई बागेतून त्यांना आत्तापर्यंत म्हणजेच अवघ्या सात महिन्यात अडीच लाखांची कमाई झाली आहे. निश्चितच 50 गुंठे जमिनीतून अडीच लाखांची कमाई घेत या युवा शेतकऱ्याने इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केल आहे. शेतीमध्ये वातावरणाच्या बदलानुसार बदल घडवून आणणे अपेक्षित असल्याचे राजेंद्र यांनी केलेल्या प्रयोगातून सिद्ध होत आहे.