Farmer Success Story:- गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर शेती क्षेत्राकडे तरुण अजिबात फिरकत नव्हते. त्यातल्या त्यात जे उच्चशिक्षित तरुण आहेत ते तर शेती व्यवसायाला अगदी बेभरोशाचा व्यवसाय म्हणून पाहत होते व कोणताही उच्चशिक्षित तरुण हा शेती करायला तयार नव्हता.
परंतु आता ही परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून हळूहळू बदलू लागली आहे व अनेक उच्चशिक्षित करून देखील आता शेती व शेतीशी निगडित असणाऱ्या व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर यशस्वी होताना आपल्याला दिसून येत आहे. शेती करत असताना यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन पीक पद्धती यांचा अवलंब करत तरुणांनी शेती क्षेत्र विकासाच्या दिशेने वाटचालीसाठी सक्षम केल्याचे चित्र आहे.
तसेच पशुपालन शेळीपालन, कुक्कुटपालना सारख्या व्यवसायात देखील तंत्रज्ञानाचा वापर करून आता उच्चशिक्षित करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असणाऱ्या शिराढोण या गावचे तरुण शेतकरी राहुल पाटील यांचे उदाहरण घेतले तर ते इतर तरुणांना प्रेरणा देणारे आहे.
राहुल पाटील यांनी जबर इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर शेती करत असताना शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करायचे ठरवले व पंधरा म्हशीचा प्रकल्प उभारला. या व्यवसायातून ते आता लाख ते दीड लाख रुपये प्रतिमहिना उत्पन्न मिळवत आहेत. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघू.
पंधरा म्हशीच्या प्रकल्पातून हा तरुण शेतकरी कमवतो महिन्याला लाख ते दीड लाख रुपये
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुका आहे व या तालुक्यात शिराढोण या गावचे राहुल कल्याणराव पाटील हे तरुण शेतकरी आहेत. त्यांची वडीलोपार्जित घरची पाच एकर शेती असून त्याच्या कुटुंबामध्ये राहुल हे सर्वात लहान आहेत. शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता पाच वर्षे अगोदर त्यांनी शेती करायचे ठरवले व शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करायचे निश्चित केले.
दूध व्यवसायाची सुरुवात करताना त्यांनी सुरुवातीला फक्त एक म्हैस विकत घेऊन सुरुवात केली. त्या एका म्हशीच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागल्याने राहुल पाटील यांचा आत्मविश्वास दुणावला व त्यांनी एकेक करून गोठ्यामध्ये म्हशी वाढवायला सुरुवात केली. त्यांच्याकडे एकूण 15 म्हशी असून त्या माध्यमातून ते म्हशीची योग्य संगोपन करतात व दूध उत्पादनातून चांगला नफा मिळवतात.
त्यांनी म्हशीसाठी स्लॅबचा गोठा उभारला आहे व या 15 म्हशींच्या माध्यमातून सकाळ आणि संध्याकाळ दोघं वेळ मिळून शंभर लिटर दूध उत्पादन त्यांना मिळते. राहुल पाटील यांना हा संपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी 20 लाख रुपयांपर्यंत खर्च आला. या सगळ्या व्यवसायामध्ये राहुल यांना त्यांच्या दोन भाऊंचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
तिघ भावांचा दिवसाची सुरुवाती चार वाजता होते व चार वाजता उठून ते दूध काढण्यापासून इतर कामे करतात. त्यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत सर्व ग्राहकांना दूध पोचवले जाते. विशेष म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी शंभर ग्राहकांना हे दूध घरपोच ते पोहोचवतात.महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च त्यांना करावा लागतो व यातून त्यांना एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळते.
म्हशींच्या शेणापासून मिळते अतिरिक्त उत्पन्न
या 15 म्हशीच्या माध्यमातून त्यांना दूधच नाही तर शेणापासून देखील आर्थिक उत्पन्न मिळते.यामध्ये त्यांना महिन्याला चार ट्रॅक्टर आणि वर्षाला 50 ट्रॅक्टर पर्यंत शेणखत मिळते व खताला मागणी चांगली असल्यामुळे एक ट्रॅक्टर पाच हजार रुपये प्रमाणे ते विकतात व यातून त्यांना वर्षाला अडीच लाख रुपयांच्या अतिरिक्त उत्पन्न देखील मिळते. तसेच या म्हशीसाठी लागणारा चारा ते घरच्या शेतातच उत्पादित करतात.
अशाप्रकारे राहुल पाटील यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दूध व्यवसायातून आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल केलेली आहे.