Railway Rule:- भारतीय रेल्वे हे भारतातील सर्वात मोठे वाहतुकीचे नेटवर्क असून एका दिवसामध्ये लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत असतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रामुख्याने रेल्वेच्या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. भारतीय रेल्वे ही भारतीय विकासाची आणि भारताची जीवनवाहिनी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
जर आपण प्रवासांच्या बाबतीत देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा विचार केला तर त्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वे अग्रस्थानी आहे. परंतु रेल्वेचे कामकाज सुरळीतपणे चालावे याकरिता रेल्वेचे काही नियम देखील आहेत व ते पाळणे प्रवाशांवर बंधनकारक आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण रेल्वेने प्रवास करायचे ठरवतो तेव्हा तो नियोजित असेल तर आपण अगोदरच रिझर्वेशन करून ठेवतो.
परंतु जर अचानक प्रवास करण्याची वेळ उद्भवली तर मात्र आपल्याला जनरलचे तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो. यामध्ये बऱ्याचदा घाई गडबडीमध्ये आपण जनरल तिकीट घेतल्यानंतर देखील चुकून का असेना स्लीपर क्लासमध्ये घुसतो व स्लीपर क्लासमधून प्रवास करण्याचा प्रयत्न करतो.
परंतु तुम्हाला माहिती आहे का तुम्ही असे केल्याने तुम्हाला याबाबत दंड देखील आकारला जाऊ शकतो. कारण याबाबतीत रेल्वेचे काही नियम आहेत व त्यांची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी देखील रेल्वेच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे या लेखात आपण याबाबत रेल्वेचे काय नियम आहेत? याबाबत थोडक्यात माहिती घेऊ.
जनरल तिकिटावर स्लीपर क्लासमधून प्रवास केला तर दंड लागतो का?
याबाबत रेल्वेचे काही नियम आहेत.परंतु काही अटी आणि शर्तींवर जनरल डब्याच्या तिकिटावर तुम्हाला स्लीपर क्लासचा प्रवास करण्याची परवानगी रेल्वेच्या माध्यमातून देण्यात येते. त्यामध्ये प्रामुख्याने पाहिले तर जनरल डब्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर गर्दी असेल व तुम्हाला जर जागा मिळाली नाही तर तुम्हाला पुढील ट्रेनची वाट पाहण्याचा सल्ला या माध्यमातून दिला जातो.
जर आपण रेल्वे अॅक्ट 1989 नुसार बघितले तर तुमचा प्रवास जर 199 किलोमीटर किंवा त्याहून कमी अंतराचा असेल तर जनरल तिकीट हे तीन तासांच्या कालावधी करिता वैध समजले जाते. परंतु या तीन तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहेत त्या ठिकाणी जाणारी दुसरी रेल्वे नसेल आणि तुम्हाला जर जागा मिळाली नाही तर तुम्ही टीटीईशी संपर्क साधून तुमच्या समस्येविषयी कल्पना देऊ शकतात.
त्यामुळे जर स्लीपर क्लास मध्ये सीट असेल तर अशावेळी टीटीई तुम्हाला दोन तिकिटांच्या किमतीतील फरकाची रक्कम आकारतो आणि तुम्हाला स्लीपर क्लासचे तिकीट देण्याची शक्यता असते. मात्र सीट उपलब्ध नसेल तर पुढील स्टेशन पर्यंत प्रवासाची परवानगी तुम्हाला मिळू शकते.
परंतु तुम्हाला स्लीपर क्लासमधूनच प्रवास करायचा आहे तर अशा हट्टावर जर तुम्ही राहिला तर तुमच्याकडून 250 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. अशावेळी तुम्ही जर दंड भरला नाही तर टीटीईच्या माध्यमातून चलन तयार करून ते थेट कोर्टात जमा करण्यास तुम्हाला सांगितले जाऊ शकते.
ही एक प्रकारे तुमच्यावर होत असलेली कायदेशीर कारवाईच असते. त्यामुळे रेल्वेच्या नियमाविरुद्ध वागण्यापेक्षा त्या नियमांचे पालन करून प्रवास करणारे आपल्या फायद्याचं असतं.