Solar Pump Price 2024:- शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी अखंडित विजेचा पुरवठा खूप महत्त्वाचा असतो. परंतु विजेचा सततचा लपंडाव आणि दिवसाऐवजी रात्री वीजपुरवठा होणे त्यामुळे शेतकरी बंधूंना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. याकरिता शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम कुसुम योजना यासारख्या योजना राबविण्यात येत असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतात सोलर पंप बसवण्यासाठी अनुदान देण्यात येते.
कारण अशाप्रकारे शेतात सौर पंप बसवण्याची किंमत खूप जास्त असल्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून या योजनांच्या माध्यमातून अनुदान देऊन शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते. याकरिता तुम्ही तुमच्या क्षेत्रानुसार किती एचपीचा सौर कृषी पंप खरेदी करावा हे ठरवू शकतात.
सौर कृषी पंप शेतकऱ्यांसाठी आहेत फायद्याचे
सौर कृषी पंप म्हणजे सोलर पंप हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असून ते इलेक्ट्रिक पंपाप्रमाणेच काम करतात. परंतु हे सोलर पंप कार्यान्वित होण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करतात व त्यामुळे तुम्हाला हवे तेव्हा पिकांना पाणी देता येते व विजेचा लपंडावाची देखील चिंता राहत नाही. तसेच हे सोलर पंप स्वच्छ ऊर्जेचा स्त्रोत आहेत व पर्यावरणाला देखील ते अनुकूल आहेत.
यामध्ये शेतकऱ्यांना जमिनीचे क्षेत्र आणि असलेली पाण्याची पातळी किंवा उपलब्धता पाहून किती एचपीचा सोलर पंप खरेदी करून तो बसवावा हे ठरवावे लागते. पाण्याची पातळी जर जास्त खोल असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने सोलर पंपाची निवड करावी लागते. शेतामध्ये प्रामुख्याने तीन एचपी पासून ते दहा एचपी पर्यंतचे सौर कृषी पंप वापरले जातात.
यामध्ये तुम्हाला जर तीन एचपीचा सोलर पंप बसवायचा असेल तर त्याकरिता 330 व्हॅटचे दहा पॅनल पॉली क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बसवणे आवश्यक आहे. तसेच पाच एचपी साठी 16 सोलर पॅनल मिळतील व ते दोन स्ट्रक्चर्ससह 330 व्हॅटचे असतात. जर तुम्हाला साडेसात एचपीचा सोलर पंप बसवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन स्ट्रक्चरच्या वर 24 सोलर पॅनल मिळतात. आणि दहा एचपी वर 32 सोलर पॅनल मिळतात व याकरिता चार स्टॅन्ड आणि चार स्ट्रक्चर बसवावे लागतात.
किती आहे त्या सोलर पंपाच्या किमती?
सध्या सौर कृषी पंपाच्या किमती कमी झाल्या असून तुम्हाला जर चांगल्या दर्जाचा तीन एचपी चा सोलर पंप घ्यायचा असेल तर तुम्हाला एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपये पर्यंत पैसे मोजावे लागू शकतात. पाच एचपीच्या सोलर पंपासाठी तुम्हाला एक लाख ते दोन लाख रुपये आणि साडेसात एचपी साठी तीन लाख रुपये आणि दहा एचपी करिता साडेतीन लाख ते तीन लाख 60 हजार रुपये दरम्यानचा खर्च करावा लागतो.
जर यामध्ये तुम्ही पीएम कुसुम योजनेचा फायदा घेऊन सौर पंप बसवण्याकरिता अर्ज केला तर तुम्हाला त्यामध्ये अनुदान देखील दिले जाते. शेतामध्ये जर सौर कृषी पंप बसवायचा असेल तर ते पॉली क्रिस्टलाईन सोलर पॅनल बसवणे गरजेचे आहे. कारण त्यांचे होल्टेज जास्त असते व याचे पॉली पॅनेल्स अधिक ठिकाणी इन्स्टॉल केले जाऊ शकतात. कारण शेतामध्ये मोटर चालवण्यासाठी जास्त होल्टेजची आवश्यकता असते व त्याकरिता पॉलीक्रिस्टलाईन सौर पॅनल शेतामध्ये महत्त्वाचे ठरतात.