बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकले असून या चक्रीवादळाचा वेग 130 किलोमीटर पेक्षा पुढे जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. रेमल चक्रीवादळ आज पश्चिम बंगालच्या किनारपट्टी जवळून बांगलादेश कडे जाणार असून त्यामुळे जोरदार हवा आणि पाऊस त्या ठिकाणी सुरू झाल्याची स्थिती आहे.
त्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसा मध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून आजूबाजूच्या 10 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. एवढेच नाही तर पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे व खबरदारीचा उपाय म्हणून विमानसेवा देखील काही तासांकरिता बंद करण्यात आलेली आहे.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जर आपण महाराष्ट्रातील एकंदरीत तापमान पाहिले तर राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढलेलाच आहे व दुसरीकडे मात्र अवकाळी पाऊस देखील हजेरी लावताना दिसून येत आहे.
रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कसे राहील हवामान?
राज्यामध्ये उकाडा वाढत असून यामुळे मान्सून लवकर येईल असे संकेत मिळत असून वाढत्या उकाडाच्या पार्श्वभूमीवर मान्सून चांगली आगेकूच करत आहे. साधारणपणे नऊ तारखेला अंदमान मध्ये मान्सून दाखल झालेला होता व 31 मे पर्यंत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
एवढेच नाही तर 10 जून दरम्यान मुंबई तसेच कोकणात मान्सून प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व त्यापुढील पाच दिवस म्हणजेच 15 जून पर्यंत मान्सूनचे नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर व त्यासोबतच मराठवाडा व विदर्भात देखील आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
महत्वाचे म्हणजे मान्सूनच्या अगोदर काही दिवस उन्हाचा तडाका अधिक वाढेल अशी देखील शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रेमल चक्रीवादळाने एन्ट्री केली असून महाराष्ट्रात देखील त्यामुळे अनेक भागात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकण किनारपट्टीवरील समुद्राच्या लाटा देखील उसळत आहेत.
यासोबतच मुंबई व कोकण, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यात अवकाळी सोबतच एक जून पर्यंत उष्णता सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40° च्या पुढे आहे.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याच्या तारखा
देशात व राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सध्या चित्र आहे व त्यामुळे देशात अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. यासोबतच मान्सूनचे आगमन पाहिले तर 10 जूनच्या आसपास मुंबई व कोकणात मान्सून प्रवेश करेल व त्यासोबतच 15 जून दरम्यान कोकणातून घाटमाथा ओलांडून खानदेश,
नासिक, अहमदनगर तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये व मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. साधारणपणे 20 जून पर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर मानसून पसरेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.