Business Success Story:- आपण अगोदरच्या आयुष्यामध्ये नेमके काय करत होतो किंवा कुठले काम करत होतो याला महत्व नसते. परंतु ते काम करत असताना आपण पुढील जीवनाच्या टप्पा कसा गाठला किंवा तो टप्पा गाठण्यासाठी कशा पद्धतीने प्लॅनिंग करून मेहनत घेतली त्याला खूप महत्त्व असते.
आज आपण अनेक उद्योजक पाहतो की त्यांनी त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणात कष्ट केले व आज अखंड मेहनत व सातत्य ठेवून यशाच्या शिखरावर विराजमान झाल्याचे बघतो. अगदी याच पद्धतीने जर आपण सीड नायडू यांची यशोगाथा पाहिली तर परिस्थिती समोर न वाकता घरोघरी वृत्तपत्र विकून कुटुंबाला गरिबीतून काढण्यासाठी या व्यक्तीने खूप प्रयत्न केले
व आज या प्रयत्नांचाच भाग म्हणून करोडो रुपयांच्या कंपनीचे ते मालक आहेत. त्यामुळे सीड नायडूचा वृत्तपत्र विक्रेता ते सिड प्रोडक्शन कंपनीचा मालक हा प्रवास नेमका कसा झाला हे आपण या लेखात जाणून घेऊ.
सीड प्रोडक्शन कंपनीचे मालक सीड नायडूंची यशोगाथा
2007 साल हे सीड नायडू यांच्या आयुष्यातील एक वाईट वर्ष ठरले. कारण यावर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले व कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. सीड यांच्या आई महिन्याला पंधराशे रुपये कमवायच्या व त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. आईची मेहनत सीड जवळून पाहत होते व आईला व कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी वर्तमानपत्र विकायला सुरुवात केली.
शाळेत जायचा वेळ होण्याआधी ते अगोदर सकाळी लवकर उठून घरोघरी वर्तमानपत्र वितरित करायचे व या कामातून अडीचशे रुपये ते मिळवायचे. तसेच घरचे आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती की त्यांना कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करणे शक्य नव्हते. याकरिता सीड नायडू यांनी दहावीनंतर एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून नोकरी करायला सुरुवात केली व यामध्ये त्यांना महिन्याला तीन हजार रुपये मिळत होते.
हे तीन हजार रुपये ते आईला पाठवत होते. परंतु कष्टावर विश्वास ठेवणाऱ्या सीड यांनी आपल्या कुटुंबाला काहीही करून गरीबीतून बाहेर काढायचे हे ठरवले व स्वतःला फॅशनच्या संबंधित कामांमध्ये गुंतवले. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ऑफिस बॉयची नोकरी सोडली आणि एका कॉफी हाऊसमध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली.
या कामानंतर एका बेंगलोर मधील मॉलमध्ये रिटेल स्टोअर येथे नोकरी सुरू केली व हे काम करत असताना मात्र त्यांचा फॅशन आणि इव्हेंट बद्दल जवळून संबंध आला. या क्षेत्रातले ज्ञान त्यांचे वाढायला लागले व या क्षेत्राबद्दल त्यांनी माहिती गोळा केली. हळूहळू फॅशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रातील लोकांशी त्यांची ओळख वाढली व फॅशनची दुनिया नेमकी कशी असते हे सीडला समजले.
बस याच क्षेत्रात पुढे जायचे असा मनोमन निश्चय सिडने करून पुढील प्रयत्न सुरू ठेवले. या प्रयत्नामध्ये असताना त्यांना शूटसाठी एक ऑफर मिळाली. परंतु त्यांच्यापुढे एक महत्त्वाची समस्या अशी होती की त्यांच्याकडे स्वतःची कंपनी नसल्यामुळे ते असाइनमेंट पूर्ण करणे खूप अवघड जात होते.
परंतु हार न मानता त्यांनी कंपनी सुरू करण्याकरिता व पहिली मिळालेली असाइनमेंट पूर्ण करता यावी याकरिता लागणाऱ्या पाच लाख रुपयांची व्यवस्था करण्याचे ठरवले.त्यामध्ये दोन लाख रुपये सीडने बचत केलेले होते व मित्र तसेच नातेवाईकांकडून बाकीचे कर्ज रूपाने पैसे उभे केले व रात्रंदिवस मेहनत करून सीड नायडू यांनी पहिला प्रोजेक्ट सक्सेस केला. बस इथून त्यांनी सुरुवात केली तर आज मागे वळून पाहिलेले नाही.
भावासोबत मिळून त्यांनी एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले व 2017 मध्ये सीड प्रोडक्शन ची सुरुवात झाली. सीड नायडू यांचा पहिला प्रोजेक्ट हा फॅशन ई-कॉमर्स कंपनी मिन्त्रासाठी होता. त्यानंतर ॲमेझॉन तसेच फ्लिपकार्ट, ग्लोबल देसी, विवो, डाबर फ्लाईंग सारख्या विविध कंपन्यांसाठी त्यांनी फॅशन शूट, स्टोअर लॉन्चिंग आणि इतर प्रभावशाली कार्यक्रम राबवायला सुरुवात केली.
एवढेच नाही तर त्यांची बनाना लिफ नावाची एक वेडिंग प्लॅनर कंपनी देखील असून ती विवाह सोहळा आयोजित करते. सीड हे फॅशन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव असून आज त्यांच्या या सीड प्रोडक्शनची उलाढाल चार कोटींच्या पुढे गेली आहे. आज त्यांचे हे प्रोडक्शन हाऊस स्वतःचे जाहिरात आणि मीडिया प्रोडक्शन हाऊस चालवते व मोठ्या ब्रँड साठी शूटिंग आणि मार्केटिंगचे महत्वाचे काम करते व आज त्यांचा हा व्यवसाय करोडोंच्या घरात आहे.