कृषी पदवीधर असलेल्या शुभम भाऊने कोकणाच्या लाल मातीत फुलवली झेंडूची शेती! मिळवत आहे उत्तम नफा

कृषी पदवीधर असलेल्या शुभम दोरकडे या तरुणाची यशोगाथा बघितली तर ती नक्कीच इतर शेतकऱ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी आहे. या तरुणाने कोकणाच्या लाल मातीमध्ये झेंडू फुल पिक घेण्याची किमया साध्य केलेली आहे.

Ajay Patil
Published:
marigold crop

Marigold Farming:- शेती परवडत नाही हे जे काही कित्येक वर्षापासूनचे रडगाणे होते त्याला आता तरुणांनी कुठेतरी फाटा दिला असून शेती व्यावसायिक दृष्टिकोनातून केली तर ती कशा पद्धतीने परवडू शकते व त्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावता येऊ शकतात? हे अनेक उच्चशिक्षित तरुणांनी गेल्या काही वर्षापासून दाखवून दिले आहे.

नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्याने अनेक उच्चशिक्षित तरुण आता शेतीकडे वळले असल्यामुळे अशा तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आणि आधुनिक पिकपद्धती आणि वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून आर्थिक समृद्धीच्या दिशेने खूप मोठ्या प्रमाणावर वाटचाल केल्याचे आपल्याला दिसून येते.

शेतीमध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून प्रवेश केलेल्या या तरुणांनी आधुनिक पद्धतीने भाजीपाला शेती, फळबागांची लागवड ते विविध प्रकारच्या फुलांची लागवडीतून आर्थिक समृद्धी साधली आहे.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण कृषी पदवीधर असलेल्या शुभम दोरकडे या तरुणाची यशोगाथा बघितली तर ती नक्कीच इतर शेतकऱ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी आहे. या तरुणाने कोकणाच्या लाल मातीमध्ये झेंडू फुल पिक घेण्याची किमया साध्य केलेली आहे.

कृषी पदवीधर असलेल्या शुभमने फुलवली झेंडूची शेती
महाराष्ट्रातील कोकणपट्टा बघितला तर या ठिकाणी आपल्याला नारळ आणि पोफळीच्या बागा मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यामुळे झेंडू सारख्या फुलांचे उत्पादन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे दसरा किंवा दिवाळी सारख्या सणांचा कालावधी असला की या ठिकाणी बाहेरचे व्यापारी फुलांच्या विक्रीसाठी येतात.

परंतु याच कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील लोवले या गावचा उच्च शिक्षित तरुण शुभम दोरकडे यांनी मात्र झेंडू लागवड करण्याचा निश्चय केला व घराशेजारी असलेल्या जमिनीत झेंडूची लागवड केली. शुभमने योग्य प्रकारे व्यवस्थापन ठेवून कोकणातल्या लाल मातीत देखील झेंडूचे पीक येऊ शकते हे सिद्ध करून दाखवले.

शुभम हा कृषी पदवीधर असल्याने तो शेतीमध्ये कायमच विविध प्रयोग करत असतो व अशा प्रकारच्या प्रयोगांमध्ये त्याला घरच्यांची पूर्णपणे साथ लाभते. याच प्रयोगाचा भाग म्हणून जून महिन्यामध्ये त्यांनी झेंडूची लागवड केली होती. या झेंडू पिकाला पूर्णपणे त्याने सेंद्रिय खतांचा पुरवठा केला व फवारणीसाठी प्रामुख्याने जीवामृत वापरले.

म्हणजे एकंदरीत पाहता शुभम यांनी सेंद्रिय पद्धतीने झेंडू फुल पिकाचे नियोजन करून सेंद्रिय झेंडूचे उत्पादन घेतले आहे. शुभम याचा मळा संगमेश्वर देवरुख या मार्गावर असून याच ठिकाणी त्याच्या शेतामध्ये सध्या केशरी आणि पिवळ्या रंगाचे झेंडूचे फुले बहरत आहेत.

र्सरी व्यवसायातून कमावतो उत्तम आर्थिक नफा
इतकेच नाही तर शुभम याने घराजवळच कृष्णाई या नावाने रोपवाटिका सुरू केली असून या रोपवाटिकेच्या कामांमध्ये संपूर्ण त्याचे कुटुंब त्याला मदत करते व ते या रोपवाटिकेत विविध प्रकारचे रोपे स्वतः तयार करून त्यांची विक्री देखील करतात.

शुभमने झेंडू तसेच शेतात लावलेल्या विविध पालेभाज्या,शेतीविषयक उत्पादनांची विक्री करण्यासाठी घराजवळच एक विक्री केंद्र सुरू केले आहे. झेंडूच्या फुलांचे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने त्यांनी उत्पादन घेतले असून सेंद्रिय खतांचा वापर केला आहे.

योग्य नियोजन करून शुभमने लाल मातीत झेंडूच्या फुलांची शेती यशस्वी केली आहे. लाल मातीत झेंडूचे उत्पादन होत नसल्यामुळे बाहेरून व्यापारी या ठिकाणी झेंडू विक्रीला येतात. परंतु कोकणात या लाल मातीत देखील झेंडूचे उत्पादन येऊ शकते हे शुभम दोरकडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe