Solar Panel Buying Tips:- वाढलेले वीजदर आणि प्रत्येक महिन्याला त्यामुळे पडणारा आर्थिक बोजा यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड प्रमाणात त्रस्त होतात व या समस्यातून सुटका मिळवण्यासाठी कमीत कमी विजेचा वापर करण्यावर भर देतात. परंतु कितीही केले तरी विजेचा वापर हा वाढताच राहतो व विज बिल हे मोठ्या प्रमाणावर येते.
याकरिता सौर ऊर्जेचा वापर ही काळाची गरज असून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून त्या माध्यमातून तयार विजेचा वापर घरासाठी करणे हे फायद्याचे ठरते. सोलर पॅनल इंस्टॉल करणे हे खूप खर्चिक आहे व त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ घेऊन तुम्ही घरासाठी सोलर पॅनल बसवू शकतात.
परंतु सोलर पॅनल खरेदी करायच्या आधी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे असते. जेणेकरून तुम्हाला नुकसान न होता त्याचा फायदा होईल व विना समस्या तुम्ही त्याचा वापर करू शकाल.
सोलर पॅनल खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करा
1- तुमच्या घराची विजेची गरज ओळखा– सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही एका महिन्यामध्ये किती विजेचा वापर करता व तुमच्या घराचा आकार किती मोठा आहे यावर तुम्ही सोलर पॅनलची निवड करू शकतात. जसे की, तुमचे घर जर वन बीएचकेचे असेल व तुमचा महिन्याचा विजेचा सरासरी वापर 200 ते 300 kWh असेल तर तुम्ही त्यासाठी दोन ते तीन किलो वाटचा सौर पॅनल बसवणे फायद्याचे ठरते.
तसेच तुमचे घर दोन बीएचकेचे असेल व तुमचा विजेचा दर महिना सरासरी वापर 300 ते 500 kWh असेल तर तुम्ही तीन ते पाच किलोवॉट क्षमतेचा सोलर पॅनल बसवणे फायद्याचे ठरते व जर घर तीन बीएचकेचे असेल व विजेचा वापर 500 ते 800 kWh असेल तर त्याकरिता पाच ते आठ किलोवॅटचा सौर पॅनल बसवणे फायद्याचे ठरते.
2- जागेची निवड व्यवस्थित करा– तुमच्या घराच्या टेरेसवर पॅनलसाठी किती जागा आहे हे अगोदर पहावे. कारण जर आपण एक किलोवॅट क्षमतेचे सोलर सिस्टम पाहिली तर त्याकरिता तीन ते चार सोलर पॅनलची आवश्यकता भासते व त्यानुसार तुम्ही जागेची निवड करणे गरजेचे असते.
3- सूर्यप्रकाशाची उपलब्धता– तुम्ही ज्या ठिकाणी सौर पॅनल इन्स्टॉल करणार आहात त्या ठिकाणी नेमका कोणत्या दिशेने सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात येतो. हे पाहून सोलर पॅनल बसवणे फायद्याचे ठरते. तुम्ही ज्या ठिकाणी सोलर पॅनल बसवणार आहात त्या ठिकाणी किंवा त्या घराच्या दिशेने सूर्याचा प्रकाश येत नसेल तर मात्र सोलर पॅनल बसवून काही फायदा होत नाही.
4- सोलर पॅनल खरेदी करण्याअगोदर त्यांच्या प्रकारांची माहिती करा– सोलर पॅनल खरेदी करण्याअगोदर सोलर पॅनलचे जे काही प्रकार असतात ते माहिती करून घेणे व त्यांचे फायदे तोटे जाणून घेणे गरजेचे असते. त्यानंतर तुम्ही तुमची उपलब्ध जागा व आर्थिक बजेट पाहून निवड करावी. सोलर पॅनलचे प्रामुख्याने पॉलीक्रिस्टलाईन, थिन फिल्म आणि मोनोक्रिस्टलाईन हे तीन प्रकार पडतात.
5- बजेट आणि वारंटी– बाजारामध्ये 70 हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयापर्यंत किमतीचे सोलर सिस्टम उपलब्ध आहेत व ते खरेदी करताना तुमचा बजेट पाहणे गरजेचे आहे. तसेच सरकारी योजनांचा फायदा घेऊन तुम्ही त्यावर अनुदान मिळवू शकतात. सोलर पॅनलवर प्रामुख्याने 10 ते 25 वर्षापर्यंत वॉरंटी देखील मिळते.
वारंटी कालावधीमध्ये जर पॅनलमध्ये काही त्रुटी किंवा बिघाड झाला तर तुम्ही कंपनीकडे विचारणा करू शकतात. सोलर पॅनल खरेदी करताना त्या पॅनलवर पावर वारंटी देखील मिळते.
कारण वेळेनुसार सोलर पॅनलची क्षमता कमी कमी होत जाते. त्या दृष्टिकोनातून पॅनलवर पाच, दहा तसेच पंधरा वर्षाची पावर वारंटी मिळते. तुम्हाला मिळालेल्या वारंटी प्रमाणे सौर पॅनल व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही वारंटी अंतर्गत बदलून घेऊ शकतात.
6- सोलर पॅनलचा विमा– सोलर पॅनल खरेदी केल्यानंतर त्यावर वारंटी मिळते. परंतु या व्यतिरिक्त तुम्ही सुरक्षितता म्हणून त्याचा विमा देखील घेऊ शकतात. ज्या गोष्टींचा वारंटीमध्ये समावेश नाही अशांकरिता तुम्ही विमा काढू शकतात.
यामध्ये तुम्ही चोरी तसेच काही नुकसान याकरिता विमा उतरवू शकतात. यामध्ये विम्याची रक्कम ही सोलर पॅनलचा आकार किती आहे त्यानुसार ठरवली जात असते. त्यामुळे सोलर पॅनल खरेदी करताना विमा काढणे फायद्याचे ठरते.