Strawberry Farming : कौतुकास्पद ! युवा शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीतून साधली आर्थिक प्रगती, एका एकरातच केली 6 लाखांची कमाई

Strawberry Farming : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. असाच काहीसा बदल नंदुरबार जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने शेतीमध्ये केला आहे. जिल्ह्यातील डाब या गावातील धीरसिंह फुसा पाडवी नवयुवक तरुणाने अवघ्या तीन महिन्यात स्ट्रॉबेरी शेतीतून सहा लाख रुपये कमवून प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी आदर्श रोवला आहे.

विशेष म्हणजे धीरसिंग हे अशिक्षित आहेत. मात्र अशिक्षित असूनही त्यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतर शिक्षित तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरणार आहे. तर पाहता धीरसिंग 2007 पूर्वी पारंपारिक पिकांची शेती करत होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र पारंपारिक पिकाच्या शेतीत त्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हतं. यामुळे त्यांनी शेतीमध्ये मोठा बदल घडवण्याचा ठरवलं. या अनुषंगाने त्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सुरुवातीच्या काळात अपुरी माहिती आणि अपूर्ण संसाधन यामुळे त्यांना स्ट्रॉबेरी शेतीत मोठे नुकसान सहन करावं लागलं. मात्र नुकसान झालं म्हणून ते मागे हटले नाहीत.

आपले प्रयत्न अविरतपणे सुरू ठेवले. मग त्यांना त्यांच्या या प्रवासात कृषी विभागाचे अनमोल साथ लाभली. कृषी विभागाच्या सल्ल्याने त्यांच्या स्ट्रॉबेरी शेतीचं 2018 मध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. 2018 मध्ये पाडवी महाबळेश्वर जे की स्ट्रॉबेरीच हब म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी अभ्यास दौऱ्याला गेले. त्या ठिकाणी त्यांना स्ट्रॉबेरी शेतीची सर्व इत्यंभूत माहिती मिळाली. मग काय स्ट्रॉबेरी शेतीचा त्यांचा पॅटर्न बदलला.

2021 मध्ये त्यांनी आपल्या एक एकर शेत जमिनीत 12,000 स्ट्रॉबेरी रोपाची लागवड केली. यासाठी 1 लाख 55 हजार एवढा लागवड खर्च पाडवी यांना आल्याचे त्यांनी सांगितले. यातून  त्यांना मात्र 3 टन उत्पन्न मिळाले. म्हणजे धिरसिंग पाडवी यांना त्यावेळी 4 लाख 50 हजार रुपयांचा नफा मिळाला. दरम्यान आता यावर्षी एका एकरात 6 टन उत्पन्न निघणार असून 6 लाख रुपये नफा मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

निश्चितच, खर्च वजा जाता एका एकरातून लाखो रुपयांची कमाई धीरसिंग यांना होणार आहे. निश्चितच पाडवी यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक असा ठरणार आहे. शेतकरी बांधवांनी जर काळाच्या ओघात शेतीमध्ये पाडवी यांच्याप्रमाणे बदल करण्याचे धाडस केलं तर निश्चितच त्यांना देखील शेतीतून लाखोंची कमाई सहज होऊ शकते.