मानलं प्रदीपरावं ! राजकारणात सक्रिय राहून सुरु केली शेती; आता अथक परिश्रमातून मिळवत आहेत निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन, होतेय लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रामुख्याने हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यासोबतच शेतीमालाला मिळणारा कवडीमोल दर यामुळे देखील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत आता कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवणे अपेक्षित आहे. त्यासाठी तज्ञांकडून वारंवार मार्गदर्शन देखील दिले जात आहे.

काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी मात्र त्यांच्या पुढ्यात असलेल्या नानाविध आव्हानांचा सामना करत शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील प्रदीप गारटकर यांनी देखील शेतीमध्ये अशीच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. खरं पाहता गारटकर राजकारणात सक्रिय आहेत. पण राजकारणात सक्रिय असले तरी देखील त्यांची शेती प्रति निष्ठा अपार आहे. हेच कारण आहे की त्यांनी राजकारणासोबतच शेती व्यवसायात देखील वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.

याच नवनवीन उपक्रमाच्या आणि प्रयोगाच्या जोरावर त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने द्राक्ष शेतीत चांगली कामगिरी करून दाखवली असून विक्रमी उत्पादन ते घेत आहेत. या कामी त्यांना त्यांच्या बंधूंची म्हणजेच प्रसाद गारटकर यांची देखील मोलाची साथ लाभत आहे. गारटकर यांनी आपल्या रामवाडी येथील 17 एकर शेत जमिनीत ऊस लागवडीचा प्रयोग केला आहे, यासोबतच पाच एकर शेत जमिनीत केळीची लागवड करण्यात आली आहे, आणि तेरा एकर शेतजमीनीत जम्बो द्राक्ष जातीची लागवड करण्यात आली आहे.

शेतीसोबतच पशुपालन व्यवसायात देखील त्यांनी हात हाच आजमावला असून 60 म्हशीचा सुसज्ज गोठा त्यांनी रामवाडी येथे उभारला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी त्यांनी द्राक्ष फळ छाटणी उशिरा केली. यामुळे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या खर्चात मोठी बचत झाली. सप्टेंबर महिन्याच्या अखेर करण्यात आलेल्या फळ छाटणीच्या बागेतून त्यांना फेब्रुवारीच्या मध्यापासून द्राक्षाचे उत्पादन मिळत आहे. सुयोग्य नियोजन करण्यात आले असल्याने त्यांना उच्च प्रतीचे द्राक्ष उत्पादन यावर्षी मिळाले आहे.

सुरुवातीचा दोन एकरावरील प्लॉटमध्ये त्यांना 20 टन इतका माल मिळाला असून यापैकी तेरा टन द्राक्ष हे निर्यातक्षम होते ज्याला 120 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. उर्वरित सात टन माल हा पन्नास रुपये प्रति किलो दराने त्यांनी विक्री केला. आता दुसऱ्या दोन एकरात असलेल्या द्राक्ष प्लॉटची हार्वेस्टिंग सुरू आहे. या मालाला देखील 107 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे.

उर्वरित नऊ एकरावरील द्राक्ष बाग देखील पक्वतेच्या अवस्थेत आहेत. यातूनही त्यांना दर्जेदार उत्पादन मिळणार आहे. निश्चितच उच्च प्रतीची द्राक्ष उत्पादित करून गारटकर बंधूंनी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम केलं असून राजकारण आणि शेती या दोन्ही क्षेत्रात गारटकर यांनी साधलेली ही प्रगती इतरांसाठी प्रेरक राहणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही.