Success Story : शेतीमध्ये गेल्या एक-दोन दशकांपासून नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश होऊ लागला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता अधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. काही नवीन आधुनिक तंत्रज्ञान शेती व्यवसायात सामील झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सोयीचे बनले आहे. आता शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. सोबतच शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पीक पद्धतीला बगल देण्यास सुरुवात केली आहे.
याचा परिणाम म्हणून आता नवीन नगदी पिकाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. एवढेच नाही तर काही शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाची शेती आधुनिक पद्धतीने करून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. दरम्यान आज आपण असाच एक प्रयोग जाणून घेणार आहोत. पालघर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तीळ, हरभरा, तूर, वाल, तागडा याचबरोबर सूर्यफुलाची शेती करून आपल्या साडेचार एकर जमिनीतून दोन लाखांची कमाई केली आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! केमिकल टाकले की बंद पडलेल्या बोअरलाही येते पाणी; सोलापूरच्या विशालच ‘विशाल’ संशोधन, गडकरींनीही थोपटली पाठ
वास्तविक पाहता पालघर जिल्हा हा भात उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. मात्र भात पिकामध्ये अधिकची मेहनत लागत असल्याने तसेच प्राप्त होणारे उत्पन्न खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांनी आता पर्यायी पिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर चहाडे येथील भालचंद्र पाटील भात पिकाला पर्यायी पीक म्हणून तेलबिया पिकांची शेती सुरू केली आहे सोबतच काही भाजीपाला पिकांची देखील ते आपल्या जमिनीत लागवड करत आहेत.
भालचंद्र पाटील सांगतात की सध्या हवामान बदलाचा पारंपारिक पिकाला मोठा फटका बसत आहे. मात्र नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे तीळ आणि सूर्यफूल पिकाला याचा फारसा फटका बसत नसल्याचे चित्र आहे. यामुळे त्यांनी तिळाची आणि सूर्यफुलाची लागवड केली आहे. साडेचार एकर जमिनीमध्ये त्यांनी तीळ हरभरा तूर तागडा अन सूर्यफूल या पिकाची शेती सुरू केले आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गरवारे ते रुबी हॉल पर्यंतची मेट्रो ‘या’ तारखेला धावणार, मुहूर्त ठरला
यात सूर्यफुलाची लागवड दीड एकर जमिनीवर झाली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या साडेचार एकर जमिनीतून त्यांना तीन महिन्यात तब्बल दीड ते दोन लाखांची कमाई होणार आहे. पावसाळ्यातील भात काढणी झाल्यानंतर या पिकाची त्यांनी शेती सुरू केली असून यातून त्यांना चांगली कमाई होत आहे. पाटील यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात भात काढणे झाल्यानंतर त्यांनी रब्बी हंगामातील पिकांची शेती सुरू केली.
भात पिकाच्या तुलनेत या पिकांना कमी पाणी लागत असल्याने तसेच या पिकावर हवामान बदलाचा विपरीत प्रादुर्भाव पाहायला मिळत नसल्याने या पिकाची लागवड त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहे. एकंदरीत पाटील यांनी शेतकरी बांधवांना हवामानावर आधारित शेती केली तर निश्चितच शेतीतून चांगली कमाई होऊ शकते हे दाखवून दिले आहे.