Success Story: एकरी 14 क्विंटल तुरीचा उतारा मिळवणारा आहे हा शेतकरी! तुम्हीही वाचा आणि त्या पद्धतीने करा नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story :- व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पिकाचे व्यवस्थापन हे काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. पिक लागवडीपासून ते पिकाची काढणी आणि मध्यंतरीच्या सगळ्या कालावधीतील कामे जर वेळेत केली व खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना वेळेत केल्या तर नक्कीच पिकांपासून भरपूर उत्पादन मिळवणे शेतकऱ्यांना शक्य होते. ही बाब भाजीपाला पिकांना आणि फळबागांना देखील लागू होते. नुसते काबाडकष्ट करून उपयोग नसून शेतीमध्ये स्मार्ट वर्क करणे खूप गरजेचे आहे.

या मुद्द्याला धरून जर पाहिले तर अनेक शेतकरी आता शेतीमध्ये खूप चांगले उत्पादन मिळवतात. साहजिकच यामागे त्यांचा कष्ट असतोच परंतु अगदी अचूक व्यवस्थापन आणि नेमक्या कालावधीत केलेल्या सर्व बाबी  त्यांना इतर शेतकऱ्यांपेक्षा जास्त उत्पादन मिळवून देत असते. याचा अनुषंगाने जर आपण तूर या पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये खरीप हंगामात तुरीची लागवड केली जाते.

शेतकरी कपाशी आणि सोयाबीन सारख्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून देखील तुरीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. दैनंदिन वापरातील एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे तुरीला आणि तूरदाळीला कायम बाजारपेठेत चांगली मागणी असते व बाजार भाव देखील चांगल्या पद्धतीने मिळतो.

या अनुषंगाने आपण तूर पीक लागवड करून त्याचे नियोजन उत्तम पद्धतीने ठेवले तर नक्कीच चांगला उतारा आपल्याला प्रति एकर मिळू शकतो. याच दृष्टिकोनातून आपण शंकरपूर बोरुडी येथील शेवाळे बंधूंचा विचार केला तर ते तब्बल 34 एकर क्षेत्रावर तुर पिक घेत असतात. त्यांचे तूर तुर पिकाचे व्यवस्थापन कशा पद्धतीचे असते हे आपण बघणार आहोत.

 शेवाळे बंधूंचे तूर नियोजन

शंकरपूर बोरुडी येथील अभंग आणि केदार शेवाळे हे भाऊ असून यांचा विचार केला तर हे तब्बल 34 एकर क्षेत्रावर तुरीचे पीक घेतात. तूर लागवडीसाठी ते प्रामुख्याने गेल्या दोन वर्षापासून गोदावरी वानाची लागवड करत आहेत व पाच वर्षापासून सलग क्षेत्रावर 22 एकर व आंतरपीक म्हणून बारा एकर असे एकूण 34 एकर क्षेत्रावर त्यांचे तूर पिकाचे नियोजन आहे. जर आपण त्यांच्या तूर या पिकाची नियोजन पाहिले तर ते साधारणपणे….

1- एप्रिल महिन्याच्या आसपास शेताची खोल  नांगरणी करतात व त्यानंतर जमीन चांगली तापू देतात. जून महिन्यामध्ये नांगरलेल्या जमिनीवर रोटावेटर मारतात व जमीन चांगली भुसभुशीत करून तूर लागवडीकरता सऱ्या ओढून घेतात. नंतर चांगला पाऊस झाल्यावर टोकन पद्धतीने तुरीची लागवड करतात.

2- तूर पिकाच्या लागवडीकरिता ते प्रामुख्याने ट्रॅक्टरच्या साह्याने पाच फूट अंतरावर सरी पाडतात व त्यावर तुरीची लागवड करतात. परंतु यामध्ये जेव्हापासून ते तुरीच्या लागवडीकरिता सुधारित वाणांचा वापर करायला लागले तेव्हापासून ते आठ बाय दीड फूट अंतरावर लागवड करत आहेत.

3- तुर पिकासाठी खत व्यवस्थापन करताना ते प्रामुख्याने जेव्हा तुरीची लागवड करतात त्यानंतर 25 दिवसांनी डीएपीच्या दोन बॅगा तसेच म्युरेट ऑफ पोटॅश अर्थात एमओपीची एक बॅग, 10 किलो फेरस सल्फेट, दहा किलो झिंक सल्फेट आणि दहा किलो सल्फर असा एक पायाभूत डोस तुर पिकाला देतात.

4- जर आपण तुर पिकावर पडणाऱ्या किडींचा विचार केला तर यामध्ये सर्वात नुकसान करणारी कीड म्हणजे शेंगा पोखरणारी अळी, फुलोरा अवस्थेमध्ये जेव्हा तूर पिक येते तेव्हा पडणारी घाटी आळी, पिसारी पतंग  इत्यादी किडीचा उल्लेख आपल्याला करता येईल. या किडींचा नियंत्रणाकरिता ते प्रत्येक वर्षाला सात ते आठ फवारण्या तुर पिकासाठी घेतात. या एकूण फवारण्यांमधून एक किंवा दोन फवारण्या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पडू नये याकरिता करतात व त्यातील तीन ते चार फवारण्या कीड व रोग नियंत्रणासाठी ते करत असतात.

5- जैविक घटकांचा वापर ते किडनियंत्रणाकरिता करतात. जैविक घटकांमध्ये प्रामुख्याने ट्रायकोकार्डचा वापर ते करत असून त्यासोबत लागवडीनंतर पहिल्यांदा पंचवीस ते तीस दिवस झाल्यानंतर ठिबकने ट्रायकोडर्मा प्रती एकर दोन लिटर  तुर पिकाला देतात व त्यानंतर साठ दिवसांनी व नव्वद दिवसांनी ठिबकने दोन वेळा ट्रायकोडर्मा देतात.

 काही महत्त्वाचे नियोजन ते अशा पद्धतीने करतात

जर आपण आताचा कालावधी पाहिला तर तो तुर हे पीक कायिक अवस्थेमध्ये असल्याचा आहे. या महिन्यांमध्ये ते प्रामुख्याने तन नियंत्रणावर भर देतात व त्यासाठी कोळपणी करतात. तण नियंत्रणाकरिता निंदनी व पिकाला मातीची भर देणे इत्यादी महत्त्वाची कामे ते या कालावधीत करतात.

महत्वाचे म्हणजे मर रोगापासून तूर पिकाचे नुकसान होऊ नये याकरता ते सुरुवातीपासूनच ट्रायकोडर्माचा वापर करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर देतात. या सगळ्या परफेक्ट अशा नियोजनाचा परिणाम म्हणजे मागच्या वर्षी त्यांना एकरी 14 क्विंटल पर्यंत तुरीचा उतारा मिळाला होता. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुर पिकाचे नियोजन केले तर नक्कीच चांगले उत्पादन हाती येऊ शकते.