लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सात टप्प्यांत पूर्ण झाल्यानंतर आता देशासह संपूर्ण जगाचे लक्ष निकालाकडे आहे. १८ व्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची मंगळवारी मतमोजणी होणार आहे.
ही मतमोजणी प्रक्रिया पुढीलप्रमाणे पार पडणार आहे. – निवडणूक संचालन नियमावली १९६१ च्या नियम ५४ अ नुसार निवडणूक अधिकाऱ्याच्या (आरओ) टेबलवर सर्वात पहिले टपाल मतांची मोजणी केली जाईल.
फक्त मतमोजणीला सुरुवात होण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी दाखल झालेल्या पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे.
– पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाल्याच्या ३० मिनिटांनंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू केली जाईल. जर मतदारसंघात पोस्टलद्वारे मतदान झाले नसेल तर थेट ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू करण्यात येईल.
मतमोजणी केंद्रावर मत मोजणीसाठी फॉर्म १७ सी सोबत ईव्हीएमच्या फक्त कंट्रोल युनिट (सीयू) चा वापर केला जाईल.सीयूवरील निकाल सुनिश्चित करण्यापूर्वी मतमोजणी अधिकारी त्यावरील सील कायम असल्याचे सुनिश्चित करतील. तसेच पडलेली एकूण मते आणि फॉर्म १७ सी मध्ये नमूद केलेल्या मतांचा आकडा एकच असल्याचे सुनिश्चित केले जाईल.
सीयूवरील निकाल मोजणी पर्यवेक्षक, सूक्ष्म पर्यवेक्षक आणि उमेदवाराच्या मोजणी एजंटला दाखवल्यानंतरफॉर्म १७ सी वर नमूद केले जाईल
सीयूमध्ये निकाल दिसत नसल्याच्या स्थितीत सर्व सीयूमधील मतांची मोजणी नंतर संबंधित सीयूच्या व्हीव्हीपॅटमधील पावतीच्या मोजणीवरून केली जाईल.
– प्रत्येक सीयूवरील उमेदवाराला मिळालेल्या मतांचा आकडा १७ सी मध्ये नमूद केला जाईल. यावर मतमोजणी पर्यवेक्षक आणि मोजणी टेबलवर उपस्थित उमेदवारांच्या मतमोजणी एजंटच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील.
प्रत्येक मतदान केंद्रावरील फॉर्म सी, त्या अधिकाऱ्याकडे पाठवणे बंधनकारक आहे, जो फॉर्म २० मध्ये अंतिम निकाल संकलित करत आहे.
व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी सीयूमधील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर केली जाईल. मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांची सरमिसळ (रँडम) पद्धतीने निवड केली जाईल.
उमेदवाराच्या विजयाचे अंतर हे नाकारलेल्या पोस्टल मतपत्रिकेच्या संख्येहून कमी असेल तर अशा स्थितीत निकाल घोषित करण्यापूर्वी पुन्हा एकदा फेटाळलेल्या
पोस्टल मतपत्रिकेचे सत्यापण केले जाईल. आघाडीच्या दोन उमेदवारांना समसमान मते मिळल्याच्या स्थितीत लॉटरी पद्धतीने निकाल घोषित केला जाईल.