अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग ! ऊसाच्या शेतीत गव्हाचं आंतरपीक ; होतोय दुहेरी फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Intercropping Wheat : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव शेतीमध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. नेवासा तालुक्यातील एका प्रयोगशील ऊस उत्पादक बागायतदाराने देखील असाच एक भन्नाट प्रयोग राबवला असून हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

नेवासा तालुक्याच्या मौजे सौंदाळा येथील दिनकर आरगडे हे एक प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी आहेत. दिनकर शेतीमध्ये कायमच नवनवीन प्रयोग राबवत असतात. याच प्रयोगाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून गव्हाची लागवड यशस्वी करून दाखवली आहे. दिनकर यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतात लावण्यात आलेल्या उसाच्या पिकात हा प्रयोग केला आहे.

ऊस लागवड करतांना दोन फूटची सरी पाडण्यात आली आणि ऊस बेणं लागवड करतांना एक सरी आड एक अशी लागवड झाली. म्हणजे ऊसाच्या दोन सरित 4 फूट अंतर तयार झालं. यातचं त्यांनी गव्हाची पेरणी केली. गव्हाचे 496 हे वाण त्यांनी आंतरपीक म्हणून घेतलं आहे. टोकन पद्धतीने गहू पेरणी त्यानी केली आहे. गहू आणि ऊस कोरड्यात लागवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

लागवडीनंतर पाणी देण्यात आले. म्हणजे एकाच वेळी दोघा पिकांना पाणी गेले. यानंतर ऊस पिकासाठी खुरपणी करण्यात आली. मग गहू आणि ऊस पिकाला बेसलं डोस दिला. रासायनिक खतांचा हा डोस दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. आता दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत असून पिकांची वाढ उत्तमरीत्या झाली आहे.

गहू कापणी नंतर ऊस पिकातील सरींमधील अंतर राखल जाणार आहे. निश्चितचं ऊसाच्या शेतीमधला आंतर पिकाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग पाहण्यासाठी इतर शेतकरी त्यांच्या बांधावर गर्दी करत आहेत. दिनकर यांनी केलेल्या या प्रयोगाचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी तोंड भरून कौतुक केल आहे.

दरम्यान कृषी तज्ञांच्या मते ऊस हे जास्तीच्या कालावधीचे पीक आहे अशा परिस्थितीत या पिकात आंतर पिकाची शेती करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ऊस पिकात गहू, हरभरा, कांदा, बटाटा, भाजीपाला यांसारख्या पिकांची लागवड करून ऊस पिकासाठी आलेला खर्च भरून काढण्यास शेतकऱ्यांना मदत होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आंतरपीक शेतीकडे वळले पाहिजे. निश्चितच दिनकर यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, यामुळे पंचक्रोशीत त्यांची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.