Shet Rasta Kayda : शेतात जायला रस्ता नाही ? हे काम करा आणि मिळवा रस्ता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shet Rasta Kayda : शेतीमध्ये सगळ्या सोयी सुविधा असल्या परंतु जर त्या शेताला रस्ता नसला तरी त्या शेताचे महत्त्व कमी होत असते. कारण प्रत्येक कामासाठी तुम्हाला शेतात जायला रस्ता असणे खूप गरजेचे आहे.

शेती तयार करताना ट्रॅक्टर आणि शेतीमाल बाजारपेठ किंवा घरापर्यंत नेण्यासाठी तुम्हाला रस्ता हा लागतोच.

परंतु बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो व अशा शेतकऱ्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा असे शेतकरी इतर शेतकऱ्यांना शेतातून रस्ता देण्यासाठी विनंती करतो मात्र बऱ्याचदा शेतकरी रस्ता देण्यासाठी तयार होत नाहीत.

त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे गरजेचे असते किंवा करावा लागतो. या अनुषंगाने तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल व तुम्हाला तो मिळवायचा असेल तर अर्ज कसा करावा व त्याकरिता कुठली कागदपत्रे लागतात? यासंबंधीचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.

शेत रस्त्यासाठी असा करावा अर्ज

शेतात जाण्यासाठी रस्ता हवा असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार नवीन क्षेत्र रस्त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येतो. या माध्यमातून शेतकऱ्याला शेजारच्या शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ता दिला जाऊ शकतो. परंतु याकरिता शेतकऱ्याला तहसीलदाराकडे लेखी स्वरूपामध्ये अर्ज सादर करणे गरजेचे असते.

अर्ज करताना तुम्ही ज्या तालुक्यातील रहिवासी आहात त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या नावाने लिखित स्वरूपामध्ये हा अर्ज करणे गरजेचे असते. त्यानंतर तुम्ही कुठला आधार घेऊन हा अर्ज करत आहेत हे नमूद करणे गरजेचे आहे. म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 च्या अन्वये तुम्ही शेतरस्त्या करिता अर्ज करत आहात असे नमूद करायचे असते.

त्यानंतर अर्जाचा विषय या कॉलम मध्ये “शेतात जाण्या येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळण्याबाबत” असा आशय तुम्हाला नमूद करावा लागतो. नंतर खाली अर्जदाराचे नाव आणि शेतीच्या माहितीचा संपूर्ण तपशील देणे गरजेचे असते.

अर्जदाराच्या नावासोबत त्याचे गाव म्हणजेच त्याचा संपूर्ण पत्ता लिहिणे महत्त्वाचे असते. त्याखाली अर्जदाराला त्याच्या शेतीचा संपूर्ण तपशील द्यायचा असतो. म्हणजे शेतीचा गट क्रमांक तसेच एकूण क्षेत्र, आकारला जाणारा शेतसारा इत्यादी माहिती देणे गरजेचे असते.

समजा एखाद्या शेतकऱ्याची शेती जर सामायिक क्षेत्रामध्ये येत असेल तर त्याच्या वाट्याला किती शेती आहे? हे देखील नमूद करणे गरजेचे असते. तसेच संबंधित शेतीची चतु:सीमा म्हणजेच आजूबाजूला कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत या शेतकऱ्यांची नावे व पत्ता याची सविस्तर माहिती देणे गरजेचे असते.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत?

1- यामध्ये अर्जदाराचा आणि शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केलेली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा

2- अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील सातबारा हा सातबारा उतारा तीन महिन्याच्या आतील असणे गरजेचे आहे.

3- शेजारील शेतकऱ्यांची नावे व त्यांचा पत्ता व त्यांचा जमिनीचा संपूर्ण तपशील

4- समजा अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयामध्ये काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसह माहिती सादर करणे गरजेचे असते.

अर्ज प्राप्त झाल्यावर तहसीलदार काय प्रक्रिया करतात?

शेतकऱ्याने सर्व कागदपत्रांसह तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर अर्जदार शेतकरी आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बांधावरून रस्ता जाणार आहे अशा शेतकऱ्यांना नोटीस पाठवून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते.

तसेच शेत रस्त्यासाठी ज्याने अर्ज केला आहे त्याला खरोखरच रस्त्याची गरज आहे का? याची तहसीलदारांच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून खात्री केली जाते.

एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार शेतरस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय घेतात. यावरून आपल्याला दिसून येते की तहसीलदार अर्ज स्वीकारू शकतात किंवा अर्ज फेटाळू देखील शकतात. परंतु जर तहसीलदारांनी अर्ज मान्य केला तर शेजारील शेतकऱ्यांच्या बांधावरून अर्जदार शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठीचा आदेश काढला जातो. यामध्ये शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जाते.

साधारणपणे तहसीलदारांच्या आदेशान्वये आठ फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो. म्हणजेच एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल इतका रुंदीचा तो रस्ता मंजूर होतो.

परंतु अर्जदार शेतकऱ्याला जर तहसीलदारांचाच आदेश मान्य नसेल तर तो आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या आत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे विनंती करू शकतो किंवा एक वर्षाच्या आतमध्ये दिवाणी न्यायालयात यासंबंधीचा दावा दाखल करू शकतो.