गेल्या काही वर्षापासून जर आपण बघितले तर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीक्षेत्र प्रचंड प्रमाणात संकटात असून त्यामुळे शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. अवकाळी पाऊस तसेच गारपीट, वादळ वारे यासारख्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेला जातो व शेतकऱ्यांना यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.
म्हणून शासनाच्या माध्यमातून अशा परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई दिली जाते. याच मुद्द्याला धरून जर आपण केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यावर्षी या शेतकऱ्यांचे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात नुकसान भरपाई मिळणार असल्याचा दावा खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
केळी उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार असल्याचा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला असून जर असे झाले तर केळी उत्पादकांना खूप मोठा दिलासा मिळेल. पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून अधिकच्या उष्णतेमुळे जे काही नुकसान झालेले आहे त्या पोटी नुकसान भरपाई मिळणार आहे.
हा लाभ प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणारा असून मुळातच जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून त्या ठिकाणच्या केळीला जीआय टॅग देखील मिळाला आहे. तसं पाहायला गेले तर जळगाव जिल्ह्याचे संपूर्ण अर्थकारण हे केळी पिकावर अवलंबून आहे.
केळी पिकावर हवामान बदलाचा खूप मोठा परिणाम होत असतो. यावर्षी जर आपण बघितले तर उन्हाळ्याच्या कालावधीत एप्रिल महिन्यात जिल्ह्यामध्ये सलग पाच दिवस 42 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद झालेली होती. त्यामुळे जिल्ह्यातील 75 महसूल मंडळातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व यामुळे केळी उत्पादक आर्थिक संकटात सापडल्याची चित्र आहे.
मिळणाऱ्या नुकसान भरपाई विषयीची माहिती देताना खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले की, शेतकऱ्यांच्या जर कमी तापमानामुळे नुकसान झाले तर हेक्टरी 26500 रुपये व जास्त तापमानामुळे नुकसान झाले तर हेक्टरी 36 हजार रुपयांच्या नुकसान भरपाई दिली जात असते.
कुणाला मिळणार ही नुकसान भरपाई?
ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पिक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे. या विमा योजनेचे निकष पाहिले तर त्यानुसार एक नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये जर सलग तीन दिवस पारा आठ अंश किंवा त्यापेक्षा कमी गेला तर हेक्टरी 26500 रुपये नुकसान भरपाई मिळते.
तसेच कमाल तापमानाच्या निकषांमध्ये जर मार्च व एप्रिल महिन्यात सलग पाच दिवस पारा 42°c पेक्षा जास्त राहिला तर केळी उत्पादकांना अशा वेळी हेक्टरी 36 हजार रुपयांची मदत मिळते. मे महिन्यामध्ये जर सलग तीन दिवस पारा 44 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त राहिला तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना 44 हजार रुपये हेक्टरी मदत मिळत असते.