गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर हार्टअटॅक येण्याच्या संबंधीचे अनेक व्हिडिओ बघितले असतील. यामध्ये कोणी लग्नात नाचताना किंवा प्रवासामध्ये, जिम मध्ये वर्कआउट करताना अचानक कोसळून व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे आपण पाहिले असेल.त्यामध्ये प्रामुख्याने हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्ट आल्यामुळे या घटना घडल्याचे दिसून येते.
आजकालचे धावपळीचे जीवनशैली तसेच आहाराकडे योग्य लक्ष न दिल्यामुळे गेल्या काही वर्षापासून हार्ट अटॅक येण्याच्या किंवा हृदयरोग असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जर आपण हार्ट अटॅकचा विचार केला तर याचे काही लक्षणे जर वेळेत ओळखली तर येणाऱ्या काही धोक्यांपासून आपल्याला वाचता येते.
याबाबत जर आपण वैद्यकीय तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्या मते हार्टअटॅक येण्याची सूचना एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक दिवस आधी देखील दिसू शकते. जर ही लक्षणे ओळखता आली तर आवश्यक वैद्यकीय मदत घेऊन उद्भवणारा धोका आपल्याला टाळता येतो.
हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधी कोणती लक्षणे दिसतात?
आपल्याला माहित आहे की हार्ट अटॅक मध्ये किंवा हृदयविकारांमध्ये जर आपण प्रमुख लक्षण पाहिले तर ते छातीत दुखणे हे असते. परंतु यापेक्षा काही लक्षणे देखील दिसण्याची शक्यता असते व यामध्ये प्रामुख्याने छातीत जड वाटणे, चिंता आणि तणाव, हृदयाची धडधड वाढणे, चालताना वगैरे धाप लागणे,
छातीमध्ये जळजळ होणे, पाठ आणि जबडा दुखणे, सामान्य थकवा आणि झोपेची समस्या इत्यादी लक्षणे दिसून येते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना ही लक्षणे अधिक जाणवतात. परंतु बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष केले जाते व याचे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जर वरील लक्षणे दिसून आली तर पटकन वैद्यकीय तपासणी करून घेणे फायद्याचे ठरते.
हार्ट अटॅक येण्याच्या एक दिवस अगोदर कोणती लक्षणे दिसतात?
हार्टअटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात किंवा शरीराकडून काही सिग्नल मिळतात. याकडे लक्ष देऊन तुम्ही हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी करू शकतात. जर यामधील आपण प्रमुख लक्षणे पाहिली तर…
छातीत दुखणे, थकवा जाणवणे, खांद्यावर अस्वस्थतेची भावना, थंड घाम येणे तसेच छातीत जळजळ किंवा अपचन, हलके डोके किंवा अचानक चक्कर येणे, मळमळ आणि उलट्या होणे, श्वास घ्यायला त्रास होणे इत्यादी लक्षणे काही दिवस अगोदर किंवा एक दिवस अगोदर दिसू शकतात. छातीत दुखणे किंवा छातीत दाब अधिक कालावधी करिता राहणे किंवा विश्रांती घेऊन जरी आराम वाटत नसेल तर ही हृदयविकाराची पूर्वसूचना असण्याची शक्यता असते.
हार्टअटॅक कसा येतो किंवा केव्हा येतो?
जर हृदयाला पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त मिळाले नाही तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. जेव्हा हृदयाच्या धमनीच्या भीतीवर कोलेस्ट्रॉलचा थर जमा व्हायला लागतो व धमनी अरुंद होत जाते तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही व हे असे अनेक वर्षापासून घडत असते. कालांतराने जेव्हा याचा प्लेक तुटतो तेव्हा रक्ताची गुठळी तयार होते व हृदयातील रक्तप्रवाह थांबतो व त्यामुळे हार्ट अटॅक येतो.