सध्या डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे अनेक प्रकारचे पैशांचे व्यवहार आता यूपीआय, नेट बँकिंगच्या मदतीने केले जातात. यामध्ये अनेक बँका तसेच एनबीएफसीच्या माध्यमातून एप्लीकेशन असून त्या माध्यमातून डिजिटल बँकिंग तसेच बिल पेमेंट इत्यादी सुविधा ग्राहकांना दिल्या जातात.
अशा पद्धतीच्या ॲप्लीकेशन प्लॅटफॉर्मवरून इन्स्टंट लोन च्या सुविधा देखील आता उपलब्ध झालेले आहेत. याच पद्धतीने आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने जिओ फायनान्स एप्लीकेशनचे बिटा आवृत्तीचे अनावरण केले असून या माध्यमातून आता वापर करताना अनेक सुविधा देण्यात येणार आहेत.
रिलायन्सने केले जिओ फायनान्स ॲपचे अनावरण
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिओ फायनान्शिअल सर्विसेस लिमिटेड च्या माध्यमातून जिओ फायनान्स एप्लीकेशनच्या बीटा आवृत्तीचे अनावरण करण्यात आले असून आता या माध्यमातून युजर्सला डिजिटल बँकिंग, यूपीआय ट्रांजेक्शन तसेच बिल पेमेंट, विमा सल्ला आणि म्युच्युअल फंडावर कर्ज घेण्याची सुविधा देखील मिळणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये कंपनीच्या माध्यमातून कर्ज सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे व यामध्ये होम लोन देखील आता मिळणार आहे.
जिओ फायनान्स ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळतील या सेवा
1- इन्शुरन्स ब्रोकिंग म्हणजेच विमा ब्रोकिंग– जिओ फायनान्स ॲप कार विमा, बाईक विमा तसेच आरोग्य व जीवन विमा यासारख्या सेवा देखील प्रदान करेल. या सेवांसाठी कंपनीच्या माध्यमातून आयसीआयसीआय लोम्बार्ड, स्टार हेल्थ तसेच डिजिट आणि एचडीएफसी एअरगो सारख्या विमा कंपन्यांशी पार्टनरशिप केली आहे.
2- डिजिटल बँकिंगची सुविधा– जिओ फायनान्स एप्लीकेशनच्या माध्यमातून आता कुठल्याही कागदपत्र विना जिओ पेमेंट बँकेत बचत खाते उघडता येणार आहे. यामध्ये शून्य शिल्लक खाते फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्डने उघडले जाईल. यासोबतच रिलायन्स स्मार्ट पॉईंटवर कॅश काढण्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.
3- यूपीआय पेमेंटची सुविधा– ज्याप्रमाणे फोन पे किंवा गुगल पे चा वापर करून पेमेंट करता येते अगदी त्याच पद्धतीने व्यवसाय मालकांना पेमेंट गेटवे ची सुविधा देखील या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. या सेवेच्या माध्यमातून व्यापारी कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग तसेच वॉलेट सारख्या डिजिटल मोड मधून पेमेंट स्वीकारता येणार आहे.
4- दहा मिनिटात मिळेल कर्ज– सध्या या जिओ फायनान्स ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज सेवेची सुरुवात म्युच्युअल फंडावरील कर्जाने करण्यात आली आहे. या माध्यमातून युजर्सला 9.9% व्याजदराने दहा मिनिटांमध्ये कर्ज मिळणार आहे. तसेच या कर्जाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असणार असून प्रीपेमेंट साठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही व विशेष म्हणजे येणाऱ्या काळात या माध्यमातून होम लोन देखील मिळणार आहे.