Hitesh Doshi Success Story:- कुठल्याही व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या स्वरूपामध्ये करून कालांतराने टप्प्याटप्प्याने योग्य नियोजन आणि मेहनतीने तो व्यवसाय वाढीस लावून यशाचे शिखर गाठणे हे कधीही फायद्याचे असते व आज आपण असे अनेक उद्योजक बघतो की त्यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात अगदी छोट्या स्वरूपामध्ये केली व आज ते जगाच्या श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण सौर ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी वारी एनर्जीचे अध्यक्ष आणि एमडी हितेश चिमणलाल दोशी यांची यशोगाथा पाहिली तर ती वरील मुद्द्याला साजेशी आहे. त्यांनी पाच हजार रुपयाचे कर्ज घेऊन व्यवसायाला सुरुवात केली व ते वर्ष होते 1985. कालांतराने या व्यवसायामध्ये वाढ करत करत आज या कंपनीचे मूल्य अंदाजे 400 कोटी रुपये इतकी आहे.
अशाप्रकारे झाली वारी एनर्जीची सुरुवात
हितेश दोशी यांनी 1985 मध्ये पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले व व्यवसायाला सुरुवात केली. आज त्यांची कंपनी वारी एनर्जी ही ऊर्जा क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते व नुकतीच या कंपनीने शेअर बाजारात देखील प्रवेश केला असून शेअर बाजारामध्ये देखील गुंतवणूकदारांचा या कंपनीला खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे.
आज हितेश दोशी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 400 कोटी रुपयांच्या आसपास असून जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये त्यांचे नाव आले आहे. जवळपास 40 वर्षापासून हितेश दोशी वारी ग्रुपचे नेतृत्व करत आहेत.
नुकतीच शेअर बाजारामध्ये या कंपनीने प्रवेश केला व यामध्ये ब्लूमबर्ग बिलीनिअर्स इंडेक्सनुसार बघितले तर वारी एनर्जीच्या इशू किंमत एक हजार पाचशे तीन रुपये होती व त्याची लिस्टिंग 997 ने वाढली व ही प्राइस 2500 रुपये झाली व त्यामुळे संपूर्ण दोशी कुटुंबाची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे.
हितेश दोशी यांचे दोन भाऊ आणि पुतणे हे कंपनीच्या संचालक मंडळावर असून त्यांचे देखील सहकार्य त्यांना या व्यवसायात लाभत आहे. महत्वाचे म्हणजे हे कुटुंब वारी ग्रुपच्या अभियांत्रिकी कंपनी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी आणि वारी टेक्नॉलॉजीजचे सर्वात मोठे शेअर होल्डर आहेत.
कसे आहे वारी एनर्जी कंपनीचे स्वरूप?
वारी एनर्जी ही भारतातील सौर ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून कंपनीची क्षमता 1200 mw आहे. या कंपनीचा महसूल जर बघितला तर प्रामुख्याने अमेरिकेतील होणाऱ्या निर्यातीतून येतो.तसेच चीनच्या सोलर सेल वरील वाढीव शुल्काचा कंपनीला खूप फायदा झाला असून यावर्षी सौर साठ्यात बरीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
तसेच कंपनीच्या आयपीओने गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देऊन खुश केले आहे. आयपीओ मधून साधारणपणे 2800 कोटी रुपये उभारून ही कंपनी आता ओडिशामध्ये सहा जीडब्ल्यू उत्पादन प्रकल्प उभारणार आहे.
हितेश दोशी कसे आले व्यवसायाकडे?
हितेश दोशी हे महाराष्ट्रीयन असून त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. जेव्हा ते मुंबईमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा १९८५ मध्ये पाच हजार रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला व त्या पैशातूनच ते कॉलेजची फीस व इतर खर्च मॅनेज करत होते.
कालांतराने शिक्षण पूर्ण करून बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि प्रेशर गेज, गॅस स्टेशन आणि औद्योगिक व्हाल्व तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली.
अशाप्रकारे 5000 रुपयांमधून त्यांनी व्यवसायात पदार्पण केले व त्यानंतर ते जर्मनीला गेले व तिथून सोलर सेल निर्मितीकडे वळले व वारी सोलर एनर्जी कंपनीची सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांच्या गावात असलेल्या वारी मंदिरावरून त्यांनी या कंपनीचे नाव वारी एनर्जी असे ठेवले आहे.