Tourist Place:- पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान करतात. कारण पावसाळ्यामध्ये निसर्गाने एक वेगळेच रूप धारण केलेले असते जे माणसाच्या मनाला मोहक आणि आनंदित करते. दैनंदिन मनातले ताण तणाव आणि दैनंदिन कामे यापासून जरासा मोकळा वेळ मिळून स्वतःला ऊर्जा देण्याकरिता पर्यटन स्थळांना भेट देणे खूप महत्त्वाचे असते. महाराष्ट्राचा विचार केला तर नागरिकांना महाराष्ट्राच्या बाहेर कुठे फिरायला जाण्याची आवश्यकता नाही.
इतक्या प्रमाणात पर्यटन स्थळे महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अनेक ऐतिहासिक खानाखुणा असलेले ऐतिहासिक गड किल्ले तर आहेतच परंतु पावसाळ्यामध्ये तर अनेक ठिकाणी वाहणारे धबधबे आणि नद्या देखील मनमोहून घेतात. त्यामुळे तुमचा जर या पावसाळ्यामध्ये कुठे फिरायला जाण्याचा प्लान असेल तर अहमदनगर जिल्हा देखील तुमच्यासाठी महत्वपूर्ण पर्याय ठरू शकतो. याच दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेणार आहोत.
अहमदनगर जिल्ह्यातील काही प्रेक्षणीय स्थळे
1- रतनगड– अहमदनगर जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक व धार्मिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेले पर्यटन स्थळ असून भंडारदरापासून 23 किलोमीटर आणि पुणे शहरापासून 183 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. हे ठिकाण ट्रेकिंग साठी खूप प्रसिद्ध असून भंडारदरा या ठिकाणाच्या प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. रतनगड किल्ला हा चार हजार पेक्षा जास्त फूट उंचीवर असून चारशे वर्षांपूर्वी हा किल्ला शिवाजी महाराजांनी वापरला होता. या किल्ल्याला हनुमान, गणेश, त्र्यंबक आणि कोकण नावाचे चार प्रवेशद्वार असून ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या किल्ल्याला तुम्ही भेट देऊ शकतात.
2- खर्डा किल्ला– हे देखील ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या एक महत्त्वाचे ठिकाण असून नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेले शिवपट्टण म्हणजेच खर्डा या ठिकाणी आहे. या किल्ल्याचे महत्त्व म्हणजे साधारणपणे 1795 रोजी मराठ्यांनी याच ठिकाणी निजामावर विजय मिळवला व या घटनेची आजही खर्डा किल्ला साक्ष म्हणून उभा आहे.
हा किल्ला 1745 मध्ये सरदार निंबाळकर यांनी बांधला व याची तटबंदी व प्रवेशद्वार अजून देखील चांगल्या स्थितीत आहे. या गावांमध्ये बारा ज्योतिर्लिंग असून श्रावणामध्ये येथे भाविकांचे खूप मोठी गर्दी असते. खर्डा किल्ल्याला जर तुम्हाला भेट द्यायचे असेल तर जवळचे विमानतळ शिर्डी तसेच औरंगाबाद व पुणे आहे. रेल्वे मार्गासाठी जवळचे रेल्वे स्टेशन अहमदनगर आहे.
3- हरिचंद्र गड– भंडारदरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेले नगर जिल्ह्यातील हरिचंद्र गड हे ठिकाण देखील ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. हा ऐतिहासिक किल्ला असून याची उंची 1424 मीटर आहे. महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंग करिता हरिश्चंद्रगड हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील हा किल्ला साधारणपणे सहाव्या शतकात बांधला गेला आहे. अकराव्या शतकातील विविध लेणी देखील या ठिकाणी करण्यात आले असून संत चांगदेव यांनी चौदाव्या शतकात या ठिकाणी ध्यान केले होते व नंतरच्या कालावधीत या किल्ल्यावर मुघलांचे नियंत्रण होते. त्यानंतर इसवी सन 1747 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. रोहिदास तसेच तारामती आणि हरिश्चंद्र हे हरीचंद्रगडावरील तीन महत्त्वाची शिखरे आहेत.
4- रेहकुरी काळवीट अभयारण्य– अहमदनगर शहरापासून सुमारे 80 किलोमीटर कर्जत तालुक्यातील रेहकुरी हे गाव असून रेहकुरी हे दुर्मिळ आणि प्रसिद्ध काळवीट अभयारण्य आहे. हे अभयारण्य 2.17 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेली असून या ठिकाणी मात्र पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यात भेट देणे योग्य ठरते. परंतु हे अभयारण्य वर्षभर खुले असते.
5- ढोकेश्वर गुहा– हे देखील एक ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून दगडाच्या पठारापासून निर्माण झालेले जे काही दोन खडकाळ पर्वत आहेत त्यामधील एक पर्वताच्या पूर्व दिशेस त्रिभुज कक्ष असलेले एक सर्वात मोठे सभागृह आहे ते म्हणजे ढोकेश्वर गुहा होय.
या ठिकाणी दोन मोठे चौरस खांब 18.28 मीटर उंच आणि 13.7 मीटर रुंद आणि दोन मोठे अर्धस्तंभ समोरच्या दिशेला आहेत. याच्या आधाराकरिता आतल्या बाजूने पूर्ण मंदिर भर अशीच एक समान रचना करण्यात आली असून आतल्या बाजूस जमिनीपासून छप्पर पर्यंत आयताकृती पोकळ शिखर आहे. ढोकेश्वर लेणी या आठव्या शतकातील आहेत. हे देखील ठिकाण भेट देण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.