Waterfall maharashtra’s:- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सगळीकडे निसर्गाने हिरवा शालू पांघरल्यासारखे दृश्य बघायला मिळत आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात डोंगररांगा लाभल्या असून या डोंगर रांगांमधून खळाळणारे धबधबे पाहून मन अगदी प्रफुल्लीत होते. दाट धुके, सगळीकडे हिरवीगार दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत अनेक जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसमवेत ट्रीप प्लान करतात. यामध्ये जर तुमचा ट्रीपमध्ये धबधबे पहायची प्लॅन असेल तर या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या धबधब्यांची माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख पाच धबधबे
1- नांगरतास धबधबा– हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा धबधबा असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून पावसाळ्यामध्ये त्याचे रूप अधिकच खुलून दिसते. आंबोली ते बेळगाव रस्त्यावर आंबोली या थंड हवेच्या ठिकाणापासून 11 किलोमीटर इतक्या अंतरावर हा धबधबा आहे. या धबधब्याचा आकार हा नांगराच्या आकारासारखा असल्यामुळे याला नांगरतास असे नाव पडले आहे. या धबधब्याच्या समोर एक छोटासा पूल आणि एक गॅलरी उभारली असून या ठिकाणी उभे राहून आपल्याला या धबधब्याचे मनमोहक रूप पाहता येते.
2- सोमेश्वर धबधबा– महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक धबधबा असून नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर आहे. या धबधब्याचा प्रवाह हा इंग्रजीतील एस या अक्षराच्या आकाराचा आहे. सोमेश्वर धबधब्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाऊस ओसरल्यानंतर हा धबधबा अक्षरशः दुधासारखा दिसतो. म्हणून याला दूध सागर धबधबा देखील म्हटले जाते. या ठिकाणी पायऱ्यांची सोय केली असल्यामुळे आपण पायऱ्यांच्या साह्याने धबधब्याच्या जवळ जाऊ शकतो. नासिक पासून 11 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.
3- सहस्त्रकुंड धबधबा– हा धबधबा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असून एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात याचा काही भाग असून काही भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात आहे. हा धबधबा 30 ते 40 फूट उंचीवरून खाली कोसळतो. सहस्रकुंड धबधब्याच्या जवळ पर्यटकांसाठी एक सुंदर गार्डन तयार करण्यात आलेले असून या ठिकाणी असलेले रंगीबिरंगी फुलपाखरे पर्यटकांना आकर्षित करतात.
4- देवकुंड धबधबा– हा एक महाराष्ट्रातील लोकप्रिय धबधबा म्हणून ओळखला जातो. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये हा धबधबा असून भिरा या गावापासून दीड ते दोन तासाच्या ट्रॅक नंतर या धबधब्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. 55 मीटर उंचीवरून नदीचे पाणी एका तलावामध्ये झेपावते व या ठिकाणी देवकुंड धबधबा निर्माण होतो. रायगड पासून हा धबधबा 30 किलोमीटर अंतरावर आहे.
5- लिंगमळा धबधबा– हा एक महाराष्ट्रातील सुंदर धबधबा असून महाबळेश्वर या ठिकाणी आहे. या ठिकाणी असलेले निसर्गरम्य वातावरण आणि खडकाळ डोंगर यांच्या मधून हा धबधबा वाहतो. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा 600 फूट उंचीवरून खाली कोसळतो. महाबळेश्वर पासून हा धबधबा आठ किलोमीटर अंतरावर आहे.