Weekend Getaways Near Pune & Mumbai:- पावसाळा म्हटलं म्हणजे सगळीकडे अगदी अल्हाददायक असे वातावरण असते. अशा वातावरणामध्ये प्रवास करणे म्हणजेच एक अद्भुत असा आनंदाचा क्षण असतो. अशातच जर प्रवास हा घाटमाथ्यावरून किंवा घाट रस्त्यावरून असेल तर या आनंदामध्ये आणखीनच मोठी भर पडते. महाराष्ट्र मधील अशी अनेक रस्ते मार्ग किंवा रेल्वे मार्ग आहेत जे काही डोंगर रांगांच्या कडेला किंवा डोंगर रांगांमधून जातात.
अशावेळी रस्ते मार्ग असो किंवा रेल्वे मार्ग या माध्यमातून प्रवास करताना पडणारा पाऊस आणि डोंगररांगांमध्ये कोसळणारे धबधबे, अंगाला गारवा देणारी वाऱ्याची झुळूक आणि हिरवी मखमली हिरवाई पहात प्रवास करण्यात खूप मजा येते. अशाच पद्धतीने जर आपण मुंबई ते पुणे प्रवास करत असाल तर तुम्हाला खूप काही पर्यटन स्थळे या मार्गावर पाहण्याची सुवर्णसंधी मिळते. या अनुषंगानेच आपण या लेखांमध्ये या मार्गावरील काही महत्त्वाची पर्यटन स्थळे जाणून घेणार आहोत.
पुणे ते मुंबई मार्गावरची आणि जवळील महत्वाचे पर्यटन स्थळे
1- माथेरान– माथेरान हे रायगड जिल्ह्यात असून हे या ठिकाणचे एक प्रसिद्ध असे छोटेसे हिल स्टेशन आहे. या ठिकाणी असलेले हिरवेगार असे दृश्य आणि प्रसन्न वातावरण मनाला खूप आनंद देणारे आहे. पावसाळ्याच्या कालावधीत म्हणजेच जून ते सप्टेंबर मध्ये होणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी असणाऱ्या अनेक ठिकाणी हे निसर्गरम्य होतात.
या ठिकाणी असलेल्या डोंगर रांगांना नव संजीवनी पावसाळ्यात प्राप्त होते. या परिसरात शार्लेट धबधबा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. वेगवेगळे व्ह्यू पॉईंट देखील खूप प्रसिद्ध असून यासोबतच या ठिकाणची नेरळ माथेरान टॉय ट्रेन खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला देखील माथेरानला जायचं असेल तर तुम्ही पुणे ते नेरळ किंवा मुंबई ते पुणे मार्गावर नेरळ स्टेशनवर उतरून त्या ठिकाणहून एखाद्या खाजगी गाडीने माथेरानला जाऊ शकतात.
2- माळशेज घाट– माळशेज घाटाचे महत्त्व म्हणजे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खुललेले नैसर्गिक सौंदर्य, आजूबाजूला पसरलेली हिरवीगार वनराई आहे आणि पावसाळ्यामध्ये अवखळपणे वाहणारे धबधबे हे माळशेज घाटाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. साधारणपणे पुण्यापासून 164 तर मुंबईपासून 154 किलोमीटर अंतरावर हा घाट असून या दिवसांमध्ये डोंगररांगांमधून वाहणारे धबधबे आणि चारही बाजूंना डोलणारी हिरवीगार झाडी त्यामुळे माळशेज घाट खूप सुंदर दिसतो.
या ठिकाणी तुम्हाला दुर्मिळ अशा फ्लेमिंगो पक्षांचे देखील दर्शन घेता येते. या ठिकाणी राहण्याची व खाण्याचे देखील व्यवस्था चांगली असून तुम्हाला स्थानिक खाद्यपदार्थ खाण्याची मजा लुटता येते. कल्याण रेल्वे स्टेशन वरून तुम्हाला माळशेज घाटात जाता येते. कारण हे रेल्वे स्टेशन या घाटापासून जवळ म्हणजेच 85 किलोमीटर अंतरावर आहे.
3- मुळशी धरण– साहशी पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण असून या दिवसांमध्ये हे धरण तुडुंब भरते तेव्हा या धरणाचे दृश्य डोळ्यात भरण्यासारखेच आहे. या धरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले हिरवीगार झाडे आणि धुके आणि ढगाळ वातावरण यामुळे हे धरण खूप मनमोहक असे दिसते. या ठिकाणी मनाला मोहणारी ताजी आणि थंडगार हवा धरणाच्या पाण्याचा खळाळणारा आवाज मनाला मोहित करतो. तसेच मुळशी धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पर्यटकांना बोटिंग तसेच ट्रेकिंग करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
4- सगुणा बाग– कर्जत जिल्ह्यात असलेला सगुना बाग हा कृषिप्रेमी आणि गावाकडच्या अनुभव ज्या पर्यटकांना घ्यायचा आहे अशा पर्यटकांसाठी केलेले उत्तम असे ठिकाण असून नेरळ रेल्वे स्थानकावरून तुम्हाला सगुना बागेत जाता येते. या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी आणि खाण्याची देखील उत्तम व्यवस्था केली जाते.
एक-दोन दिवसाची ट्रिप करिता तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. हे कृषी पर्यटन केंद्र असून या ठिकाणी तुम्हाला बैलगाडी सफर, झोपाळे तसेच मातीची घरे, बोटिंग तसेच फिशिंग, शेतातून मारलेला फेरफटका, विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी अशा अनेक गोष्टींचा आनंद तुम्ही सगुना बागेत घेऊ शकतात. या ठिकाणी जर तुम्हाला जायचे असेल तर नेरळ रेल्वे स्टेशन वरून सगुना बागेने आयोजित केलेल्या गाडीतून अथवा खाजगी वाहनाने देखील तुम्ही जाऊ शकतात. या ठिकाणी एक हजार रुपये प्रत्येकी प्रवेश शुल्क असून यामध्ये जेवणाचा देखील समावेश आहे.
5- कान्हेरी गुहा– तुम्ही जर मुंबईमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पाहायला जाल त्या ठिकाणी तुम्हाला ही कान्हेरी गुहा बघायला मिळेल. वर्षभर पर्यटकांची या ठिकाणी गर्दी असते. परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप सुंदर असे वातावरण असल्यामुळे पावसाळ्यात खूप मजा येते. कान्हेरी गुहा गौतम बुद्धांचा गुहा आहे व पावसाच्या पाण्याचा या ठिकाणी सतत ऐकू येणारा आवाज मनाला मोहन टाकतो व एक शांत अशा वातावरणाची अनुभूती देतो. या गुहांमध्ये असलेले कोरीव काम आणि त्या ठिकाणी पसरलेली हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते.
6- ठोसेघर धबधबा( कामशेत )- पुणे ते मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे व कामशेत नावाचे पुणे जिल्ह्यात कामशेत नावाचे एक छोटेसे गाव देखील आहे. हे निसर्गाने समृद्ध असे गाव असून हिरवीगार डोंगराई मुळे पर्यटकांचे हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तसेच कामशेतचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन आहे.
पावसाळ्यामध्ये या ठिकाणी थंडगार वातावरण असते व कामशेत हे पुणे व लोणावळा मार्गावरील एक रेल्वे स्टेशन असून इंद्रायणी नदी या स्थानकाला लागून वाहते. या ठिकाणी भात सडण्याच्या खूप गिरणी असून या ठिकाणी तांदळाच्या आंबेमोहर व इंद्रायणी या स्थानिक जातींचे चांगले उत्पादन निघते व कमीत कमी किमतीमध्ये या जातींचा तांदूळ या ठिकाणी मिळतो. पुण्यापासून हे ठिकाण 48 किलोमीटर अंतरावर आहे.